डोके-बाद हेल्मेटवीर

By Sandesh Prabhudesai
11 April 2013 13:57 IST

डोकं नाही त्यांनी हेल्मेट वापरू नये. (अर्थांत, इथं डोकं म्हणजे मेंदू वा सारासार विचार करण्याची शक्ती, नुसतं डोस्कं नव्हे.)

ज्या नऊ आमदारांनी हेल्मेट घातल्याशिवाय बुलेट घेऊन विधानसभेत येण्याचा महान पराक्रम केला त्यांना डोकं आहे की नुसतं डोस्कं याचा उहापोह खुद्द मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनीच विधानसभेत केला. एखादा बाप उनाड मुलांना ज्या भाषेत खडसावतो, अक्षरशः त्या भाषेत त्यांनी आपल्या अजाण बालकांना खडसावलं – “तुम्हाला डोकं आहे म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय. त्या डोक्याचा वापर करा.” अप्रत्यक्षरित्या, आपले आमदार डोकं वापरत नाहीत हे त्यांनी मान्यही केलं. अर्थात, यात दोष त्यांचा नाही. जे निवडून आले आहेत त्यांना घेऊन ते सरकार चालवीत आहेत. दोष द्यायचाच असेल तर तो मतदारांना द्यायला हवा. कारण परिवर्तन हवं आहे म्हणून पहिल्यांदाच डोकं वापरून त्यांनी या लोकप्रतिनिधींना निवडून दिलेलं आहे.

हेल्मेट घातल्याशिवाय महामार्गावरून बुलेटसारख्या फॅन्सी दुचाकी घेऊन विधानसभेत येण्याचा हा जो प्रकार घडला त्याला दोन बाजू आहेत. एक – कायद्याचा भंग. आपण जे सगळे कायदे पाळतो ते या विधानसभेत (वा लोकसभेत) तयार केले जातात. त्यामुळे ते कायदे पाळण्याचं पहिलं बंधन या आमदार वा खासदारांवर येतं. त्यांनी कायदे मोडू तरी नयेत ही पहिली अपेक्षा असते. हेल्मेट घातली नाहीत म्हणून कायदा मोडला तर आम्ही दंड भरू ही भाषा त्यांना शोभत नाही. परंतु दुर्दैवाने त्यांनी तीच भाषा वापरली. त्यांच्या कृत्याची ‘शिक्षा’ म्हणून त्यांना सरकारने दंडही ठोठावला. किती?  प्रत्येकी शंभर रुपये! तोही पोलिसांनी इमानेइतबारे ठोठावला नाही. प्रसारमाध्यमांनी हा प्रकार उघडकीस आणला म्हणून नंतर दोन-तीन दिवसांनी हा दंड ठोठावला गेला.

दुसरा प्रश्न आहे तो याहून जास्त महत्वाचा आहे. का म्हणून या नऊ आमदारांनी – त्यातल्या त्यात मोटारसायकल चालविणाऱ्या एक मंत्री धरून पाच आमदारांनी – हेल्मेट घातल्याशिवाय येण्याचा निर्णय घेतला? कायद्याचे त्यांना ज्ञान नाही का? कायदा आपणास लागत नाही अशी त्यांची भावना आहे का? आपण कायद्याहून उच्च पदी आहोत असे त्यांना वाटते का? की ही नुसती सत्तेची गुर्मी आहे? मोटारसायकल घेऊन विधानसभेत येणे ही कल्पना तशी वाईट नव्हती. या तरुण आमदारांचे वय बघता गोमंतकीय तरुणाईमध्ये या कृतीचे कौतुकच झाले असते. परंतु दुर्दैवाने त्यांना हेल्मेट न घालता येण्याची दुर्बुद्धी सुचली आणि कौतुकापेक्षा त्यांची छीथूच जास्त झाली. काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या म्हणण्य़ानुसार हेल्मेट घालूया ही आपली सूचना त्यांनी धुडकावली म्हणून आपण त्यांच्यासोबत जाण्याचा बेत रद्द केला असे ते म्हणतात. त्यांच्या या विधानाला अजून कोणी विरोध केलेला नाही, तेव्हा रेजिनाल्ड सांगतात ते खरे मानण्याशिवाय पर्याय नाही.

हे सर्व आमदार विधानसभा सुंकलात आले तेव्हा पत्रकारांनी त्यांना हेल्मेटविषयी विचारले तर आम्ही हेल्मेट गेटपाशी ठेवली आहेत अशी चक्क थाप या लोकप्रतिनिधींनी ठोकली. हा पराक्रम, की “खोटारडेपणा हा आमदाराचा जन्मसिद्ध हक्क आहे” हे ठासून सांगण्याचा अट्टाहास? “हेल्मेट नसेल तर दंड ठोठावा” अशीही भाषा त्यांनी वापरली. तरीही पत्रकारांनी डोक्याला रुमाल बांधून आलेल्या मिकी पाशेकोंना विचारलेच – हेल्मेट न घालण्याच्या या कृतीतून एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता? त्यावर मिकींनी काय उत्तर द्यावे? “तुम्ही मिडियावाले किती कायदा पाळता ते आम्हाला ठावूक आहे.” काय डोकेबाज उत्तर! बहुतेक हेल्मेट न घातल्यामुळेच डोके असे चालू शकत असावे.

अर्थात, हे सर्वांनीच केले असे नव्हे. बघूया कोण काय करतो ते असे गुर्मीत सांगून डोक्याला केवळ रुमाल गुंडाळून मिकी परत फर्र करून आपली फॅन्सी दुचाकी घेऊन गेले. मात्र रोहन खंवटे व आव्हेर्तान फुर्तादोंनी हेल्मेट मागवून घेतले तर मायकल लोबोंनी जाहीररित्या लोकांची माफी मागितली. आपली चूक बहुतेक आमदारांना उमगली आहे अशीच त्यामुळे सर्वांची भावना झाली. परंतु दोन दिवसांनी सोमवारी परत विधानसभा भरली आणि वेळ्ळीचे आमदार बेंजामीन सिल्व्हांनी हा भ्रमाचा भोपळा फोडला. त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या बुधवारी विधानसभेत हेल्मेट सक्तीवर चर्चा झाली होती. त्यावेळी विरोधी पक्ष नेते प्रतापसिंग राणे यांनीसुद्धा या कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, आम्हीही तुमच्यासोबत आहोत असे आश्वासन दिले होते. त्यामुळे या प्रश्नावर लोकजागृती कशी करावी यावर आपण, आव्हेर्तान व खवंटेनी चर्चा केली व त्यातून ही कल्पना निघाली. म्हणून ते सर्वजण हेल्मेट न घालता आले अशी मखलाशी बेंजामीननी केली. नशीब, सभापतींनी त्यांना वेळीच आवरले, अन्यथा विधानसभेतील सर्वांच्याच तोंडांचे झालेले आ बंद करण्यास कदाचित बराच त्रास झाला असता.

एवढ्याने हे प्रकरण संपले नाही. बेंजामीनना थोपवून मुख्यमंत्री पर्रीकरांनी या आपल्या उनाड पोरांना झोडपून काढले. त्यांना दंडही ठोठावण्यात आला आहे हे सांगण्यासाठी त्यांनी थोडी उपरोधिक भाषा वापरली. त्यांच्या या कृतीमुळे सरकारी तिजोरीत भर पडलेली आहे व आज सरकार काही जास्त रकमेने श्रीमंत झालेले आहे अशा शब्दांत त्यांनी दंडाची माहिती दिली. यावर मंत्रीगण धरून सत्ताधारी आमदारांनी काय करावे? चक्क बाके वाजवली. का? आमदारांचे अभिनंदन करण्य़ासाठी? त्यांनी सरकारी तिजोरीत भर टाकली म्हणून? मुख्यमंत्र्यांचा उपरोधही समजून घेण्याएवढे डोके आज राहिलेले नाही? यानंतर इतरही दुचाकीस्वारांनी अशीच सरकारी तिजोरीत भर टाकीत रहायचे काय? त्यांचेही असेच जाहीर अभिनंदन होईल काय? म्हणजे शेवटी डोके नसलेल्यांचीच चलती होईल काय?

प्रश्न केवळ हेल्मेटचा वा कायद्याचा भंग केल्याचा नाही. त्याहूनही गंभीर आहे. अशा प्रकारांकडे आपले लोकप्रतिनिधी कोणत्या दृष्टीने पहातात हा आहे. आपण सर्वजण कोणत्या दृष्टीने पहातो हा आहे. त्या दिवशी स्वतःला कायद्याहून थोर समजणाऱ्या काही हेल्मेट न घातलेल्या पत्रकारांनाही दंड भरावा लागला हेही चांगलेच झाले. यातून आपण एक धडा शिकू शकू का? शहरातील रस्त्यांवर हेल्मेट नको हे ठीक आहे. परंतु महामार्गावर गेल्यावर हेल्मेट घालणे आपला स्वतःचा जीव वाचविण्यासाठी महत्वाचे आहे हे आता तरी आपण समजून घेऊ का? फक्त आमदारांनीच नव्हे, आपणही हेल्मेट घालायला हवे हे डोक्यात घेउया का? आपणाजवळ केवळ डोस्के नाही, डोकेही आहे हे आपण प्रत्येकजण सिद्ध करून दाखवूया का? की आम्ही सगळेच डोके-बाद हेल्मेटवीर?

(दैनिक हेराल्ड मध्ये प्रसिद्ध)

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of HCN and Prudent, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs