लॉर्ड भिकू आणि विधानसभा

By Sandesh Prabhudesai
14 February 2013 23:19 IST

यंदाच्या डी डी कोसंबी कल्पना महोत्सवात एक उत्कृष्ट व्याख्यान झाले ते लॉर्ड भिकू पारेख यांचे. मूळ गुजरातचे असलेले लॉर्ड भिकू हे लंडनच्या हाउस ऑफ कॉमन्समधील एक संसदपटू आहेत. एक राजकीय विचारवंत आणि अर्थतज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. राजकीय तत्वज्ञान व इतिहास, सामाजिक सिद्धांत, प्राचीन आणि आधुनिक भारताचे राज्यशास्त्र अशा विविध विषयांत त्यांचा हातखंडा आहे. याच अनुषंगाने ‘सामाजिक वादविवादाची भारतीय परंपरा’ या विषयावर त्यांचे अप्रतिम व्याख्यान झाले. योगायोगाने यंदापासून कोसंबी कल्पना महोत्सवातही एक वादविवाद सुरू झाला. ‘भारतीय प्रसारमाध्यमांतील महिलेची प्रतिमा’ या विषयावरील हा वादविवाद चांगलाच रंगला.

भारताने वादविद्या कशी विकसित केली आणि वादशास्त्राचे सिद्धांत कसे तयार केले याचा इतिहासच या व्याख्यानात बोलताना लॉर्ड भिकूनी पुढे ठेवला. तत्वनिर्मुषु, विजुगुषु व वितंड असे तीन प्रकार त्यांनी मांडले. तत्वनिर्मुषूमध्ये संवादातून सत्य शोधून काढले जाते तर विजुगुषूमध्ये सत्य मानल्या जाणाऱ्या गोष्टींना आव्हान देत वादविवाद होतात, मात्र वितंड हा केवळ नकारात्मक व विघातक वृत्तीचा असतो. ‘वादे वादे जायते तत्वबोध’ ही म्हण यातूनच तयार झाली. भारताला वैदिक काळापासून वादविवादाची दोन हजार वर्षांची परंपरा आहे.  याच वादविवादातून भारत प्राचीन काळापासून तात्विक व सांस्कृतिक पातळीवर विकसित होत आलेला आहे हेही त्यांनी ठासून सांगितले.

त्यासाठी त्यांनी प्राचीन काळापासून आजपर्यंतच्या कित्येक गाजलेल्या वादविवादांची उदाहरणे  दिली. सनातन विरुद्ध बौद्ध, सनातन विरुद्ध लोकायत, लोकायत विरुद्ध बौद्ध वा जैन, हिंदू विरुद्ध ख्रिश्नन मिशनरी, हिंदू धर्मातील विविध विचारसरणींमधील वादविवाद यातून भारतीय समाजाची प्रागतिक विचारसरणी कशी घडत गेली याचे विवेचन डोक्यात लख्ख प्रकाश टाकणारे होते. त्याकाळी काही राजे-महाराजे महत्वाच्या प्रश्नांवर जाहीर वादविवाद घडवून आणीत असत. हिंदू आणि ख्रिश्चन धर्मावरील बनारसच्या महाराजांनी आयोजित केलेला वादविवाद तर म्हणे तब्बल तीन आठवडे चालला होता.

ब्रिटीश भारतात आले त्याच वेळी औद्योगिक क्रांतीतून जगभरात आधुनिकतेची लाट आली. सरंजामी विचारसरणीला आव्हान देत पुरोगामी विचारसरणी पुढे यायला लागली. खास करून सर्वांना शिक्षण, महिलांचे शोषण, बालविवाह, विधवाविवाह, जातीभेद व कष्टकऱ्यांचा छळ असे अनेक विषय चर्चेला यायला लागले. राजाराम मोहन रॉय, इश्वरचंद विद्यासागर आणि सनातनी ब्राह्मण यांच्यातील वादविवाद गाजला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात तर ब्रिटिशांशी लढतानाच विचारवंत स्वातंत्र्यसेनानींमध्ये झालेले वादविवादही तेवढेच रंगले. महात्मा गांधींचे तर रविंद्रनाथ टागोर, बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, जवाहरलाल नेहरू यांच्याशी विविध  विषयांवर वादविवाद झाले. स्वातंत्र्यपूर्व असेम्ब्लीतील वादविवाद हा तर वैचारिक भारताचा खजिना आहे. त्याचाच परिपाक म्हणून भारताने आज सर्वोत्कृष्ट स्वरुपाचे संविधान जगाला दिलेले आहे.

श्रीमंत म्हणून गणले जाणारे हे वैचारिक वादविवाद केवळ मौखिक स्वरुपातच नव्हे तर वृत्तपत्रे, नियतकालिके, पुस्तके आणि ग्रंथांच्या लिखित माध्यमाद्वारेही रंगले. संसद वा विधानसभांमध्ये आजही स्वातंत्र्योत्तर काळातील वादविवादांचा ठेवा उपलब्ध आहे. लॉर्ड भिकू पारेख यांच्या मते वादविवाद व निषेध (डिबेट अँड प्रॉटेस्ट) यांच्या पायावर भारतीय लोकशाही भक्कमपणे उभी आहे. कालपरवा झालेला अण्णा हजारेंचा भ्रष्टाचारविरोधी लढा, लोकपाल विधेयकावर आजही चालू असलेला वादविवाद आणि सामुहिक बलात्काराविरूद्ध झालेल्या निषेधातून आकारास येत असलेला प्रागतिक स्वरुपाचा कायदा ही त्याचीच द्योतके आहेत.

परंतु त्याचबरोबर वादविवादांची ही श्रीमंत परंपरा दिवसेंदिवस गरीब होत चालली आहे ही लॉर्ड भिकू पारेख यांची खंत आहे. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून लोकपाल तयार होईल, परंतु भ्रष्टाचाराच्या मुळाकडे जाणारा वादविवाद झालेला नाही. बलात्काराला आळा घालण्यासाठी कायदा तयार होईल, परंतु महिलांकडे बघण्याच्या शोषित स्वरुपाच्या दृष्टिकोणावर वादविवाद होत नाहीत ही त्यांची खंत आहे. प्रसारमाध्यमांतील वादविवाद व्यक्तिसापेक्ष व एकांगी होत आहेत आणि वादविवादांचे प्रमुख स्थान असलेली संसद व विधानसभा ही वितंडवाद व गोंधळ घालण्याची व्यासपीठे बनलेली आहेत. शिवाय व्यक्तिस्वातंत्र्यावर दिवसेंदिवस येत असलेल्या मर्यादांमुळे भारतीय लोकशाहीची अधोगतीकडे वाटचाल चालू आहे याविषयीही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

अशा वेळी लोकायुक्त कायद्यावर गोव्यात वाद सुरू झाला व विधानसभेत वादग्रस्त विधेयक संमत झाल्यावरसुद्धा आपण या विषयावर विरोधकांशी वादविवाद करण्यास तयार आहोत असे सांगणाऱ्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांचे खरोखरच कौतुक करावयास हवे. एका बाजूला सर्व विरोधकांना घेवून असा एक वादविवाद त्यांनी एका टीव्ही चॅनलवर केलासुद्धा. त्यात आपल्या काही मुद्यांचे खंडन केले तर काही चुका प्रांजळपणे कबूल करून त्यात सुधारणा करण्याचे जाहीररित्या मान्यही केले. आता तर लोकायुक्तावरील जाहीर वादविवादाचा परिपाक म्हणून उत्तराखंडच्या धर्तीवर नवीनच विधेयक आणण्याचे त्यांनी मान्य केलेले आहे. हा विधायक वादविवादाचाच परिणाम.

हीच परंपरा गोव्याच्या विधानसभेने पुढे न्यावी अशी अपेक्षा आहे. परवाच्या विधानसभेत मोपा विमानतळावरील खास चर्चा आणि लोकायुक्त विधेयकावरील वादविवाद यांचे रुपांतर प्रश्नोत्तराच्या स्वरुपात करून सभापतींनी चुकीचा पायंडा घातलेला आहे हे हक्कभंगाचा धोका पत्करून नमूद करावेसे वाटते. काही महत्वाच्या विषयांवरील चर्चा ही चर्चात्मक स्वरुपाचीच व्हायला हवी. प्रश्नोत्तरांची नव्हे. या चर्चा व डिबेट अपेक्षित असलेल्या या कार्यक्रमात अधिकाराचा वापर करून मतप्रदर्शनास मज्जाव करणे अत्यंत आक्षेपार्ह आहे. त्यात विधेयकांवरील वादविवाद (डिबेट) हा तर विधायकांचा मूलभूत अधिकार. तेच त्यांचे प्रमुख कार्य. परंतु तिथेही प्रश्न काय ते विचारा, मतप्रदर्शने नकोत अशी भुमिका घेतल्यास लॉर्ड भिकू पारेख सांगतात त्या लोकशाहीच्या पायाचे काय होईल? भारताच्या उज्वल परंपरेचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या भारतीय जनता पक्षाकडून वादविवादाच्या या परंपरेला उर्जितावस्था आणण्याची अपेक्षा केली तर तो हक्कभंग होईल काय?

(दैनिक हेराल्ड मध्ये प्रसिद्ध)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs