ओपिनियन पोलाचे समाजशास्त्र काय?

By Sandesh Prabhudesai
21 January 2013 22:44 IST

ज्याला मराठी बोलता येत नाही, वाचता येत नाही वा लिहिताही येत नाही ती व्यक्ती म्हणते – मराठी माझी मातृभाषा. आणि ज्याला मराठी बोलता येते, वाचता येते आणि लिहिताही येते ती व्यक्ती म्हणते – कोंकणी माझी मातृभाषा. हे अजब तर्कट गोव्यातच घडू शकते. ते घडले. त्यावर भारतातील एकमेव जनमत कौल गोव्यात झाला. स्वातंत्र्यसैनिकांच्या सहभागाने घडलेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसला नाकारून गोमंतकियांनी बहुनजसमाजाचा नारा देणाऱ्या, पण महाराष्ट्रात विलीन होण्याचे ध्येय बाळगणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला मुक्तीनंतरच्या 1963 मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने सत्तेवर बसवले. पण प्रत्यक्षात गोवा महाराष्ट्रात विलीन करावा की वेगळा ठेवावा या मूलभूत मुद्यावर पक्षविरहीत मतदान झाले तेव्हा 1967 च्या जनमत कौलात मात्र बहुमताने विलिनीकरणाच्या विरोधात मतदान करून गोवा वेगळा ठेवला. नंतर लगेच परत विधानसभा निवडणुका झाल्या तर परत एकदा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षालाच गोमंतकियांनी बहुमताने निवडून दिले. गोवा महाराष्ट्रात घालू पाहणाऱ्या भाऊसाहेब बांदोडकरांना तर विक्रमी 92 टक्के मतांनी निवडून आणले.

आज 45 वर्षांनंतर जेव्हा ओपिनियन पोलवर चर्चा होते तेव्हा राधाराव ग्रासियससारखे अभ्यासू राजकारणी पॉप्युलिस्ट बनतात व म्हणतात – भाऊ गोव्याची अस्मिता नष्ट करायला निघाले होते. तर या आरोपाला उत्तर देताना ओपिनियन पोल म्हणजे केवळ एक फार्स होता व बोगस मतदानाच्या जोरावर ओपिनियन पोल जिंकला असा प्रत्यारोप भाऊंच्या कन्या व त्यांच्या वारसदार मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर करतात. दुसऱ्या बाजूने ओपिनियन पोलाचा बाप कोण यावरही चर्चा सुरू आहे. मात्र वर उल्लेखिलेल्या अजब तर्कटाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करताना कोणीही दिसत नाही. एवढेच नव्हे तर विलिनीकरणाच्या या विषयाचे आजपर्यंत एक तर भाषिक दृष्ट्या वा राजकीय दृष्ट्याच जास्त विश्लेषण झालेले दिसते. समाजशास्त्रीय दृष्टिकोणातून या संपूर्ण विषयाचे विवेचन केलेले आजपर्यंत तरी वाचनात आलेले नाही. आजच्या या छोट्याशा लेखातून तर ते शक्यच नाही. कुणीतरी तेव्हाच्या तळागाळातील सत्य परिस्थितीची मागोवा घेवून ओपिनियन पोलाचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करणे आवश्यक आहे. कारण भाऊ गोव्याची अस्मिता नष्ट करायला निघाले होते हे जेवढे पूर्णतया खरे नाही तेवढेच ओपिनियन पोल हा एक फार्स होता हाही बकवास आहे.

मुळात हा केवळ भाषावाद होता, विस्तारवाद होता की बहुजनवाद होता हा महत्वाचा प्रश्न आहे. ज्यांना मराठी केवळ म्हणता येते पण बोलता-वाचता-लिहिता येत नाही त्या बहुजनांनी मराठी आपली मातृभाषा म्हणून गर्जना का म्हणून करावी? आणि नंतर त्याच बहुजनांनी विलिनीकरण का नाकारावे? गोव्यात त्या काळी ख्रिश्चन समाज केवळ 35 टक्के होता. तरीही विलिनीकरणाविरुद्ध 55 टक्के लोकांनी मतदान केले. हे 20 टक्के अर्थातच हिंदू होते. आणि त्या काळातही उच्चवर्णीय केवळ दोन ते अडीच टक्के होते. म्हणजेच बहुजन समाजाने विलिनीकरणाविरुद्ध मतदान केले होते. 64 टक्के हिंदू व 35 टक्के ख्रिश्चन असलेल्या गोव्यात ओपिनियन पोलात 54 टक्के मतदान संघराज्याला तर 44 टक्के मतदान विलिनीकरणाला जाते तेव्हाच सिद्ध होते की ओपिनियन पोल हा केवळ धार्मिक तेढीतून जन्मलेला नव्हता. त्यामागील कारण दुसरेच काहीतरी असणे साहजिकच होते.

एक शक्यता आहे. गोवा मुक्त होण्याच्या एक वर्ष पूर्वी 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून महाराष्ट्र राज्य जन्माला आले होते. काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले होते वा त्यांनी आल्या आल्या कसेल त्याची जमीन हा कायदा अंमलात आणून सर्व कुळांना शेतीच्या मालकीचा हक्क दिला होता. 1961 मध्ये गोवा मुक्त झाल्यावर 1963 मध्ये पहिली विधानसभा निवडणूक जाहीर झाली होती. मात्र काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाले तेव्हा त्यात कालपर्यंत पोर्तुगिजांचे लांगूलचालन करणाऱ्या भाटकारांचीही उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे बहुजन समाज आतल्या आत भडकला. त्यातूनच गोव्याची काँग्रेस फुटून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष घडला तर महाराष्ट्रातही मुंबई काँग्रेस गोव्याच्या काँग्रेसबरोबर तर उर्वरित महाराष्ट्र काँग्रेस मगोबरोबर अशी उभी फुटली. मगोला महाराष्ट्रातील प्रजा समाजवादीचीही साथ लाभली. महाराष्ट्रात गेल्यास आपणासही जमिनीचा मालकी हक्क मिळेल ही भावना बहुजनसमाजामध्ये तयार झाली. आणि शंभर टक्के सत्तेवर येवू अशा गुर्मीत वावरणाऱ्या काँग्रेसचे पूर्णतया पानिपत झाले. त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही.

हा विजय बहुजनसमाजाच्या अस्मितेचा होता. त्यांच्या मालकी हक्कांचा होता. पोर्तुगीज काळापासून चालत आलेली उच्चवर्णियांची सत्ता संपविणारा तो विजय होता. त्यातूनच महाराष्ट्रात गेल्यास बहुजनांच्या मोठ्या राज्यात आपण जावू व आपणास पूर्ण संरक्षण मिळेल अशी भावना बहुजन समाजाची झाली होती. तिचेच पडसाद ओपिनियन पोलमध्ये उमटले. म्हणून मराठी बोलू-वाचू-लिहूसुद्धा शकत नसलेल्यांनी मराठी आपली मातृभाषा म्हणून सांगत ओपिनियन पोलमध्ये (गोवा महाराष्ट्रात विलीन) ‘झालाच पाहिजे’च्या घोषणा देत फुलाला मते दिली.

त्या काळातील विचारवंत पुढारी सांगतात त्याप्रमाणे विलिनीकरणाच्या विरोधातील चळवळ एकसंघ नव्हे तर तीन वेगवेगळ्या गटांमध्ये चालत होती. एक होता डॉ जॅक सिक्वेरांची ख्रिश्चन समाजाचे वर्चस्व असलेली युनायटेड गोवन्स पार्टी. दुसरी होती इंडियन नॅशनल काँग्रेस. आणि तिसरी ‘राष्ट्रमत’ हे वृत्तपत्र व ‘जय गोमंतक’ कलापथक काढून प्रचारात्मक  आंदोलन करणारे बहुतांश हिंदू कोंकणीवादी. यातील या तिसऱ्या संघटनेने वेगवेगळे मुद्दे व युक्तिवाद मांडून हिंदू बहुजनसमाजाला आपल्या बाजूला वळविण्यात यश मिळविले. ‘भाऊसाहेब मुख्यमंत्री हवेत तर दोन पानांना मते द्या’ हा युक्तिवाद तर भाऊंनासुद्धा पटला असे म्हणतात. गोवा वेगळे राहून भाऊंचे राज्य आले तर आपणाला आपले जमिनीचे हक्क मिळू शकतात हे चिंतनशील हिंदू बहुजनसमाजाला पटले. त्यातूनच बाजू पलटली व विलिनीकरणवाद हरला. भाऊ हरले व भाऊ जिंकलेही. आणि म्हणूनच 1967 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ओपिनियन पोल हरलेला मगो पक्ष तेवढ्याच ताकदीने पुनश्च सत्तेवर आला.

सांगण्याचा मुद्दा एवढाच की ओपिनियन पोल हा केवळ भाषेचा मुद्दा होता, विस्तारवादी वृत्तीचा मुद्दा होता की कूळ-मुंडकार असलेल्या बहुजनसमाजाच्या जमीन मालकीचा मुद्दा होता यावर आणखीनच खोलात जावून संशोधन व विश्लेषण होणे महत्वाचे आहे. केवळ भाऊंना शिव्या देणे वा ओपिनियन पोलास फार्स म्हणणे हा उथळपणा आहे. तेव्हाची प्राप्त परिस्थिती मान्य करून तिचे राजकीय, आर्थिक, समाजशास्त्रीय व सांस्कृतिक दृष्टिकोणातून विवेचन केले तरच आपल्या हाती सत्य येईल. अन्यथा  ओपिनियन पोलावरील चर्चा हाच एक फार्स ठरेल.

(दैनिक हेराल्ड मध्ये प्रसिद्ध)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

Depends who you talk to. For those whom 'Konkani' is a 'bolibhasha' of marathi (and experts have proved it) they will say their mother tongue is marathi, even if they are not able to 'TALK' chaste marathi.

It is guys like you who consider yourself 'konkani-bhas (dream)-extremist and anti-marathi ,but at the same time earn a livelyhood by writing in marathi.

- Dhavlikar_Gajanana, Goa, Ponda | 23 rd January 2013 06:36

 

Related Blogs