नववर्षाचा सृजन-संकल्प

By Sandesh Prabhudesai
04 January 2013 00:30 IST

डोंगरांचं भोवताल.... शेतांची शीतलता.... शेणानं सारवलेलं अंगण.... पिठुर चांदणं.... उबदार थंडी.... नीरव शांतता.... सर्व लाइट्स ऑफ.... पेटतेय फक्त एक पणती, मधोमध.... तिच्याभोवती लांबलचक वाटोळं करून अंधुक दिसताहेत माणसांचे सिल्व्हेट इफेक्ट्स.... अचानक ती पणती अधांतरी चालायला लागते त्या माणसांकडे.... तो पणतीवाला पेटवतो त्यांतली एक पणती त्या माणसांतील एकाची.... आणि एकामागून एक एकामेकांची पणती जातात पेटवत.... हळूहळू सिल्व्हेट इफेक्ट्स वितळत जातात पणतीच्या प्रकाशात.... खुलू लागतात एकेक चेहरे थ्रीडी डायमेन्शनमध्ये.... इतक्यात सुरू होते बासरीवर धून.... वातावरण बनतं आणखीनच आल्हाददायक.... उजळून निघतात सगळेच चेहरे पणतीच्या मंद प्रकाशात.... आणि इतक्यात सुरू होते धीरगंभीर आवाजात – उजवाडाक होरावणी....

हे उजवाडा

मना मनांत आमच्या

विस्वास रुजय

आत्मविस्वास जागय

काळजांत सप्तरंगी उजवाड भेटय

आमकां कर स्वयंप्रकाशीत

आमच्या विचारांक दी स्फुर्त

आनी आचारांक दिका

उबारपाक घुडी

नव्या समाज रचनेची....

होरावणी होरावत जाते.... मना-काळजात भिनत जाते.... बासरीचे सूर चढतच जातात.... मनातील आचार-विचारांना धुंद करीत जातात.... चढत जाते नशा प्रकाशाची.... होरावणीची.... सुरांची.... काळखातील मनभूल प्रकाशाची....

आणि नकळतच उलगडतं नवं वर्ष. 31 डिसेंबरातून 1 जानेवारीत. अगदी नकळत. एका आगळ्याच धुंदीत. एका वेगळ्याच मनमस्त मस्तीत. कुठेच नसतो जल्लोष. पण मनात उठलेला असतो कल्लोळ. विचारांचा. भावभावनांचा. त्याच झिंग वातावरणात प्रत्येकाची पणती जाते तुळशीवृंदावनापुढे. आणि सुरू होतात मिठ्या नववर्षाच्या शुभेच्छांच्या. हळूहळू होतात लाइट्स ऑन, आणि मनातल्या भावनाही.

गेली 20 वर्षं सत्तरीच्या देंगणांनी चालत असलेला नववर्षाचा संकल्प दिन मी यंदा पहिल्यांदाच अनुभवला. अगदी आकंठ पिवून घेतला. प्रकाश पर्येकर या संवेदनशील युवकाच्या संकल्पनेतून त्याच्या तार सत्तरीच्या घराच्या अंगणातून हा सुरू झाला. पाच वर्षांनंतर एकेकाच्या अंगणात चालत गेला. इथे सत्तरीतील लोकं जमतात. लहानांपासून थोरांपर्यंत सगळी. शिवाय आमच्यासारखे कित्येक बाहेरगावचे आमंत्रित. यंदाचा संकल्प दिन राघोबा पेडणेकराच्या अंगणात संपन्न झाला. त्याचं घर तर अजबच ठिकाणी. विर्डीचं त्याचं घर रस्त्याच्या बाजूलाच आहे. रस्त्याच्या एका बाजूला गोवा तर त्याचं घर महाराष्ट्रात. भौगोलिक सीमांचे बंध तोडून मने जोडणारा हा सोहळा ही एक अनुभूतीच होती. सोमनाथ कोमरपंतांसारखे विचारवंत आणि दिगंबर सिंगबाळसारके कलाकार तर न चुकता गेली कित्येक वर्षे हे नववर्ष सत्तरीकरांबरोबर साजरे करीत आहेत.

दर वर्षी या संकल्प दिनी काही तरी नवीन प्रकार असतो. यंदा गोपिनाथ गावसने उसगावातील फकीरांना बोलावले होते. गेली 40 वर्षे गोव्यात असलेल्या या फकिरांनी डफलीवर थाप देत सुफी संगीताची मैफलच सादर केली. कव्वाली, शेर, गझल अशी मैफल चढतच गेली. सुफी संगीताची धुंदी आगळीच असते. त्यांचे शेर सरळ काळजाला भिडतात. अल्लाशी थेट संवाद साधणारे हे फकीर संतांच्या शेरांना संगीतात गुंफून मानवतेचे पैलू उलगडत जातात. मन शुद्ध करतात. विकारांना हाकलून लावतात. धर्मापलिकडे नेऊन एकात्मतेचं एक नवं नातं जोडतात. त्या दिवशी फकीर गावू लागले आणि तिथल्या युवकांचेही हात फुरफुरू लागले. त्यांनी सरळ आपला पेटी-तबला काढला आणि बसले त्यांच्यासोबत वाजवायला. एका वेगळ्याच संगमातून एकात्मतेचं संगीत काळीज ‘चिरीत’ गेलं. सर्व मनांना एकत्र आणण्याची संगीताची शक्ती सर्वांनीच अनुभवली. मनातील खुज्या विकारांना दूर करणारी ती शक्ती खरोखरच अगाध.

स्वतः कवी असलेल्या हनुमंत चोपडेकरांच्या अध्यक्षतेखातील झालेलं कवी संमेलनही तेवढंच जबरदस्त होतं. सत्तरीसारख्या ग्रामीण समजल्या जाणाऱ्या भागात दडलेली सर्जनशीलता त्या रात्री उसळ्या मारीत उफाळत होती. आधुनिक समजल्या जाणाऱ्या किनारपट्टी भागातील शहरी लाटांना सहजगत्या शरमिंदा करणारी ती सर्जनशीलता केवळ शब्दांतूनच नव्हे तर संगीताच्या तालावरही नाचत होती. केवळ प्रेमकवितांची ती मैफल नव्हती. पर्यावरणापासून सामाजिक बदलापर्यंतच्या सगळ्याच भावनांचा बांध त्या रात्री फुटला होता. कोमरपंत सरांनी तर सांगितलेसुद्धा – सत्तरी हेच गोव्याचे सृजन केंद्र आहे. अर्थात, या अशाच विविध प्रकारांच्या सर्जनशील कार्यक्रमांतून ते सृजन केंद्र बनलेले आहे.

31 डिसेंबरच्या त्या रात्री संपूर्ण जग गोव्याच्या समुद्रकिनारी भागात जमले होते. कानठळ्या बसविणारे संगीत वाजवीत, दारूच्या नशेत वा नृत्याच्या धुंदीत संपूर्ण जग त्या रात्री आणि 31 डिसेंबरच्या प्रत्येक रात्री गोव्याच्या किनारी भागात धुंद होवून नाचत असते. त्यात मग ड्रग्स फुंकणारेही काहीजण असले तरी बहुतांश लोक अंमली पदार्थसेवन करणारे नसतात. भारतातले कॉर्पोरेट जग दिवसेंदिवस जास्तच भौतिकवादी बनत चाललेय. यांत्रिक बनत चाललेय. कृत्रिम बनत चाललेय. या यंत्रवत युगात लोकांची संवेदनशीलता घुसमटतेय. तिला वाट हवी असते स्वतःला मोकळं करण्याची. त्यातूनच ते मग येतात विशाल पसरलेल्या दर्याच्या किनारी स्वतःच्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी. ड्रग्स, दारू वा नुसतं संगीताच्या तालावर नाचत राहून स्वतःला बेभान मोकळं करण्याचा प्रयत्न करतात. काहीजण यशस्वी होतात तर काहीजण क्षणिक आत्मिक समाधान घेवून परत जातात.

या पार्श्वभूमीवर सत्तरीतील हा संकल्प दिन वेगळाच. कारण या रात्री ते फक्त एक वेगळी धुंदी चढवत नसतात. जाण्यापूर्वी नव्या वर्षाचे आपापले संकल्प एकत्र बसून सर्वांना जाहीर पद्धतीने सांगतात. ते पूर्ण करण्य़ासाठी धडपडतात. पुढच्या वर्षी परत संकल्प दिनाला येवून आपली किती संकल्प पूर्ती झाली आणि झाली नाही तेही सांगतात आणि नव्या वर्षाचा नवा संकल्प जाहीर करून जातात. तसे आपण सगळेच काही ना काही संकल्प करीतच असतो. कधी पूर्ण करतो तर कधी अर्ध्यावरच सोडून देतो. पण सगळं काही वैयक्तिक पातळीवर वा जास्तीत जास्त कौटुंबिक वा मित्रपरिवार पातळीवर. मात्र हा संकल्प दिन सामुहिक पातळीवर असतो. तो एक सामाजिक जबाबदारीही घेवून येतो. म्हणूनच तो मनाला जास्त भावतो.

वाटतं, सर्व गोवाभर गावागावातून असे संकल्प दिन झाले तर किती सुंदर बनेल गोवा!

(दैनिक हैराल्ड मध्ये प्रसिद्ध)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs