‘रणमालें’ आधुनिक रंगभूमी व्हावी

By Sandesh Prabhudesai
14 December 2012 19:51 IST

याच महिन्यात आयुष्यात पहिल्यांदाच रणमालें पाहण्याचा योग आला. सत्तरीची ग्रामीण कला आणि सांस्कृतिक संस्था रणमालें कलाकार स्वर्गीय रामा धुरी स्मृतिप्रित्यर्थ गेली काही वर्षे त्यांच्याच दाबोस गावात दोन दिवसांचा रणमालें महोत्सव आयोजित करते. इथे फक्त रणमालें सादर झाली नाहीत तर त्यावर संशोधनात्मक व चिकित्सक स्वरुपाचा परिसंवादही झाला. त्यामुळे सादरीकरणातून कलानंद देण्याबरोबरच बुद्धीला चालना देण्याचाही प्रयत्न झाला. रणमालेंची पाळेमुळे शोधून काढण्याचा प्रयत्न लोककला संशोधक, लेखक व अभ्यासकांनी केला. त्यामुळे रणमालेंची एक परिपूर्ण प्रतिमा डोळ्यांपुढे उभी झाली. अर्थात, शेवटी हा कलाप्रकार काय तो कळायचा असेल तर तो प्रत्यक्ष बघायलाच हवा. त्यातच त्याची खरी मजा असते.

रणमालें हे एक नाट्य. परंतु केवळ संवादांचे नव्हे. त्यात गीत आहे, संगीत आहे, नृत्य आहे, नाट्य आहे. त्यात पौराणिक कथाकथन आहे. मात्र केवळ इतिहास उगाळत बसण्याची ही कलाकृती नव्हे. पौराणिक पात्रांना रणमालेंत ‘संवंगां’ म्हणतात. रामायण-महाभारताचा संदर्भ घेत ती येतात. परंतु नंतर त्यात अधिक जिवंतपणा येतो. कारण त्यात समाजातील विविध पात्रे येतात. त्यांना रणमालेंत ‘धोंगां’ म्हणतात. ती या मातीतील अस्सल व्यक्तिमत्वे आपणापुढे अक्षरशः जिवंत करतात. तीही त्यांच्या खास शैलीत व भाषेत त्यांचेच हेल काढीत. त्यात विडंबनही असते आणि समाजाचे प्रतिबिंबनही असते. विनोद तर खळाळणाऱ्या झऱ्याप्रमाणे अखंड वहात असतो. संपूर्ण मंडप नुसता खसखसत व खदखदत असतो. हसण्याच्या सर्व प्रकारांवर कुणाला संशोधन करायचे असेल तर त्यांनी रणमालेच्या प्रयोगांना जावे. जागोर हा प्रकारही जवळजवळ असाच आहे. इंत्रूजच्या (कार्निवाल) वेळी खास करून साश्ट तालुक्यात होणारे खेळ अशाच प्रकारचे असतात. परंतु या तिन्हींमध्ये सर्वात प्रभावी कोणता कलाप्रकार असेल तर तो रणमालें.

रणमालेंची ही लोकपरंपरा जतन करून ठेवावी या उद्देशाने हा रणमालें महोत्सव साजरा केला जातो. परंतु हा संपूर्ण महोत्सव पहाताना व परिसंवाद ऐकताना एक विचार सातत्याने अस्वस्थ करीत राहिला. लोककला ही पारंपारिक पद्धतीनेच व्हायला हवी व ती आहे तशीच जतन करुन ठेवायला हवी हा संशोधकांचा अट्टाहास. पहिल्या प्रथम आधुनिक कला आणि प्राचीन लोककला ही विभागणीच चुकीची वाटते. कला ही कला असते. त्यात ती बहुजनांची असते त्यावेळी तर जास्तच प्रभावी असते. पूर्वीच्या काळी ती मांडावर शांत वातावरणात कसलेही तंत्रज्ञान न वापरता संपूर्ण रात्र जागवीत सादर व्हायची. आजच्या गजबजाटाच्या युगात ती रंगमंचावर ध्वनिक्षेपक लावून व लाईट इफेक्ट्स वापरून सादर होते. नोकरदारांच्या या अर्थव्यवस्थेत मध्यरात्रीपर्यंत ती गुंडाळलीही जाते. जशी नाटके गुंडाळली जातात तशीच. म्हणजेच बदलत्या सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून आपण या कलाप्रकारात बदल करतो. तर मग इतर बाबींमध्ये प्राचीन परंपरांचा अट्टाहास कशासाठी? त्यांना लोककलाप्रकार म्हणून संबोधायचे, मात्र आजच्या लोकांपासून त्यांना दूर इतिहासात नेवून ठेवायचे असा विरोधाभास कशासाठी? लोककला म्हणजे प्राचीन कला, की लोककला म्हणजे लोकांची लोकांनी लोकांसाठी सादर केलेली कला? तर मग आज लोकांची जी परिस्थिती आहे ती या लोककला प्रकारांतून परिवर्तित व्हायला नको का?

प्रत्येक लोककला प्रकाराला स्वतःचा एक गाभा आहे. तो गाभा महत्वाचा. तो तुटता कामा नये. बहुतेक लोककला प्रकारांतून लोकजीवनाच्या कथा व व्यथांचेच पडसाद घुमतात. साहजिकच आहे. आपल्या मनातील आचार-विचार, घुसमट, संघर्ष, भावभावना व प्राप्त परिस्थितीवर भाष्य करण्यासाठीच म्हणून तर कलेचा जन्म झाला. जेवढ्या प्रखरपणे त्यातून लोकजीवनाचे पडसाद उठतात तेवढी ती समर्थ लोककला. जेवढी ती समाजाच्या हुंकारांपासून दूर जाते तेवढी ती लोकांपासून दूर गेलेली कला. त्यात जिला आपण लोककला म्हणतो ती तर जनमानसाच्या वर्तमान परिस्थितीपासून दूर नेणे म्हणजे तर कलेच्या गाभ्याशीच केलेली प्रतारणा होईल. कला हा खळखळत वाहणारा झरा होणे महत्वाचे. ते डबके झाले तर कलेचे पाणी कुजेल. ते निरुपयोगी होईल. त्यातील जिवंतपणा मरून जाईल. ती कलाच प्रेतवत होवून जाईल. प्राचीन परंपरा जतनाच्या नावाने त्यात प्रचलित काळाचे प्रतिबिंब पडण्यापासून रोखले गेले तर तो लोकांच्या कलेवर प्रहार करण्याचा निर्दयी प्रकार ठरेल. काळानुसार या लोककलेत बदल होत जाणे स्वाभाविक आहे. प्रत्येक कलाप्रकाराचा मूळ गाभा न मारता त्यात आकर्षक बदल आणले तर तो कलाप्रकार लोकांमध्ये जास्त लोकप्रिय होईल. तीच खरी लोककला ठरेल. आजच्या गोंयकारांमध्ये आमचा गोव्याचा तोणया मेळ का लोकप्रिय नाही, मात्र गरबा व दांडिया जास्त का लोकप्रिय आहे यात कदाचित याचे उत्तर मिळू शकेल. अर्थात, दांडियाचे होत असलेले विकृतीकरण सोडून.

या सर्व कला प्रकारांमध्ये रणमालें हा सर्वात जास्त प्रभावी प्रकार आहे. कारण त्यात गीत, संगीत, नृत्य, संवाद, नाट्य, नकला अशा सगळ्याच कला प्रकारांचा सुरेख संगम आहे. जागोर व खेळांचीही अशीच ताकद आहे. शिवराम कारंथांनी कर्नाटकातील यक्षगानाला नवा आकार दिला व आधुनिक स्वरुपात ते लोकप्रिय केले. कर्नाटकातील यक्षगानापेक्षाही रणमालें जास्त लोकप्रिय होवू शकते. कारण त्याची सर्वात मोठी ताकद आहे ती प्राप्त सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक परिस्थितीवरील जळजळीत भाष्य. तेही नकला, विनोद, विडंबन अशा खुसखुशीत प्रकारांतून. त्यातून रणमालेंचा आधुनिक आविष्कार हा अत्यंत प्रभावी नाट्यप्रकार होवू शकतो. कारण त्यात एक संपूर्ण कथा नसते. वेगवेगळ्या प्रसंगांच्या चित्रणातून रणमालें पुढे जात असते. जसे तियात्रात एक कथा, सायड शोच्या पोटकथा आणि प्रत्येक कांतारातून वेगवेगळे विषय हाताळले जातात तसे. आज तियात्र ही संपूर्ण भारतातील सर्वात यशस्वी रंगभूमी आहे हे लक्षात असू द्या.

रणमालें हा कलाप्रकार ‘लोक(प्रिय)कला’प्रकार करण्याचे आव्हान गोव्यातील रंगभूमीपुढे आहे. त्यातील गीत, संगीत व नृत्य प्रकारात शास्त्रशुद्धता आणली आणि नवनवीन प्रसंगांतून संवादांच्या ताकदीवर सामाजिक भाष्य करीत हा कलाप्रकार सादर झाला तर निव्वळ गद्य वा संगीत नाटकांनासुद्धा मागे टाकून हा कलाप्रकार सर्वात पुढे जावू शकतो. पाहिजे ती केवळ लोककलेकडे पाहण्याची डोळस दृष्टी. या प्रभावी कलाप्रकाराला डबक्यातून बाहेर काढून त्याचा खळखळता झरा करण्याची. आमचा आधुनिक कलासक्त व सर्जनशील गोमंतकीय कलाकार हे आव्हान स्विकारेल काय?

(दैनिक हेराल्ड मध्ये प्रसिद्ध)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs