कला केवळ मनोरंजन नव्हे

By Sandesh Prabhudesai
25 November 2012 00:30 IST

2004 साली गोव्यात पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला तेव्हा मनोहर पर्रीकर हेच मुख्यमंत्री होते. त्यावेळी इफ्फी म्हणजे काय याची कुणालाच कल्पना नव्हती. खुद्द पर्रीकरांनासुद्धा. फ्रांसिस्को मार्टिन्स यांनी तर बॉलिवूडमधील सर्व फिल्म स्टार्सना घेवून कॉर्निश स्ट्रीट आणि आयनॉक्सचा परिसर सजवला होता. चित्रपटांच्या प्रवेशिका मिळवण्यासाठी सर्वांचीच गर्दी लोटली होती.  मात्र एकेक दिवस जावू लागला आणि थिएटरमधील गर्दी आटू लागली. ज्यांना प्रवेशिका मिळाल्या नाहीत त्यांच्या मते कॉर्निश स्ट्रीटवरील मनोरंजन आणि खाण्या-पिण्याचे स्टॉल्स म्हणजेच इफ्फी असे समीकरण झाले. संपूर्ण गोव्यातून संध्याकाळी कांपालवर गर्दी उसळू लागली.

मात्र त्याचवेळी गोमंतकीय लेखक, कलाकार व विचारवंतांनी खरा इफ्फी म्हणजे काय तो समजून घेतला. चित्रपटांची जाण वाढू लागली. इफ्फी म्हणजे केवळ मनोरंजनात्मक चित्रपट नव्हे तर सत्यदर्शक कलात्मकतेचा अविष्कार हा साक्षात्कार होवू लागला. चित्रपट म्हणजे केवळ कॅमेऱ्यापुढे उभे राहून डायलॉगबाजी केलेले नाटक नव्हे तर कमीत कमी डायलॉग असूनसुद्धा केवळ कॅमेरा व संकलनासारख्या इतर तांत्रिक गोष्टींच्या आधारे प्रभावीपणे चित्रित केले गेलेले सत्य ही जाणीव रुजू लागली. कॅमेरा बोलायला लागला. त्यात लक्ष्मीकांत शेटगावकरांच्या ‘पलतडचो मनीस’ या कोंकणी चित्रपटाला सिने जगतातील सर्वात प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि कोंकणी चित्रपटानेही आगळी वेगळी उंची गाठली.

याचाच परिणाम म्हणून शॉर्ट फिल्ममधून गोमंतकातील सर्जनशील व संवेदनशील कलाकार अत्यंत प्रभावीपणे प्रवर्तित होवू लागला. सुरवातीला इफ्फीच्यावेळी आयोजित केली जाणारी 24 फ्रेम्सची स्पर्धा व नंतर गेली कित्येक वर्षे चालू असलेला ‘छोटा सिनेमा’ यातून गोमंतकीय कलाकाराची कला शॉर्ट फिल्ममधून सादर होवू लागली. आजपर्यंत कधीही हाताळले गेले नव्हते ते विषय कलेच्या माध्यमातून परिणामकारकरित्या सादर होवू लागले. दुर्देवाने या वर्षापासून ‘छोटा सिनेमा’च बंद केला गेला आहे. त्यामागील कारण उमजलेले नाही. परंतु या आयोजकांमध्ये एक काँग्रेसवाला पुढारी होता म्हणून जर भाजपा सरकाराने तो बंद केलेला असेल तर त्यांना क्षमा नाही. जर आणखी काही कारण असेल तर क्षमस्व. खरे म्हणजे गोव्यात चित्रपट संस्कृती रुजवायची असेल तर लघुचित्रपट ही त्याची पहिली पायरी आहे. फीचर फिल्म नव्हे.

त्याहून जास्त दुःखाची गोष्ट आहे ती मनोरंजन या संज्ञेची. गोव्यातील पहिल्या इफ्फीवेळी तत्कालीन मुख्यमंत्री पर्रीकरांनी घोषणा केली होती – गोवा मनोरंजनाचे केंद्र करणार. मधल्या काळात काँग्रेसची सत्ता आली. त्यांनी घोषणा केल्या नसतील, परंतु हेच मनोरंजनाचे धोरण पुढे नेले. आता पर्रीकर परत मुख्यमंत्री झालेले आहेत. दुर्देवाने आठ वर्षांनंतर आजसुद्धा तीच धोरणात्मक भाषा ते बोलत आहेत – मनोरंजनाची. चित्रपट म्हणजे मनोरंजन आणि महोत्सव म्हणजे ग्लॅमर हे समीकरण अजून सुटत नाही. इफ्फीसारखा जगभरातील रियॅलिटी सिनेमा (वास्तवात्मक चित्रपट) दाखविणाऱ्या महोत्सवासाठी गोव्यात स्थापन केली गेली आहे ती ‘मनोरंजन’ सोसायटी. इफ्फीचा खरा अर्थ समजला असता तर ती मल्टिमिडिया सोसायटी झाली असती. या सोसायटीमध्ये जे पदाधिकारी घेतले जातात त्यांच्याही डोक्यात मनोरंजनाशिवाय इतर गोष्टी जातच नाही. कारण साधे आहे. हे पदाधिकारी विशेष अधिकार असलेले पास गळ्यात अडकवून इफ्फीमध्ये केवळ मिरवतात. एकही रियॅलिटी सिनेमा कधी बघत नाहीत. बघितलाच तर त्यातला रिट्रोस्पेक्टिव्ह वा हॉमेजखाली दाखवला जाणारा मनोरंजनात्मक चित्रपट. त्यामुळे आडातच नाही तर मग पोहऱ्यात येणार कोठून?

म्हणूनच हे सर्वच आयोजक, कला म्हणजे मनोरंजन असे साधेसरळ समीकरण लावतात आणि गोवा मनोरंजनाचे केंद्र करण्याची भाषा बोलत सुटतात. अर्थात, मनोरंजन म्हणजे कला नव्हे असे काही नाही. परंतु कला म्हणजे ‘केवळ’ मनोरंजन हा समज असेल तर तो साफ चुकीचा आहे. कला म्हणजे मुळात कल्पकता. सत्य परिस्थितीपासून फँटसीपर्यंत सर्व गोष्टींचा यात समावेश होतो. त्यात मनोरंजनाचाही समावेश होतो. परंतु ‘केवळ मनोरंजनाचा’ होत नाही. इफ्फीतील सिनेमा पाहिल्यानंतर डोके जड होते. दुसरा सिनेमा लगेच बघण्यासारखी मनस्थिती नसते. जगातील विविध प्रकारच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व वैयक्तिक पातळीवरील मानसिक संघर्षांचे भेदक चित्रण या चित्रपटांतून होते. ते प्रभावीपणे दाखवण्यामध्ये कल्पकतेचा कस लागतो. म्हणूनच तर काही चित्रपट दाखवू नयेत अशी मागणी करीत काही काळचक्र मागे फिरवणाऱ्या संस्था दर वर्षी कोणत्या ना कोणत्या चित्रपटाच्या नावे निषेध करताना आढळतात.

गोवा हे कलेचे माहेरघर आहे. केवळ मनोरंजनाचे नव्हे. इथे गावागावात आणि घराघरात एकेक ‘कलाकार’ दडलेला आहे. मनोरंजनकार नव्हे. त्याच्याशी कल्पकता आहे. केवळ खुषमस्करी करणारी मनोरंजनात्मक कलात्मकता नव्हे. तो संवेदनशील आहे. त्याच्यापाशी जनमानसाच्या भावभावनांशी प्रामाणिक असणारी एक ठोस विचारसरणी आहे. ती प्रभावीपणे मांडण्याचे तांत्रिक कसब मात्र त्याच्यापाशी नाही. ते विकसित होण्यासाठी केवळ इफ्फीच नव्हे इतर कित्येक माध्यमांची गरज आहे. या सर्व माध्यमांशी या गोमंतकीय कल्पक व संवेदनशील कलाकाराचा संबंध आला तर गोव्यात अद्वितीय असे काही तरी घडू शकते. केवळ चित्रपटांतून नव्हे, तर साहित्य, गीत, संगीत, नृत्य, नाट्य, चित्रपट, चित्रकला अशा सगळ्याच कलाप्रकारांतून. जिथे जिथे या संवेदनशील गोमंतकीय कलाकाराला ही संधी लाभलेली आहे तिथे तिथे त्याने हे सिद्धही करून दाखवलेले आहे. लक्ष्मीकांत शेटगावकर ही त्याची नवी आवृत्ती.

म्हणूनच गोव्याला हवे आहे ते औद्योगिक धोरण नव्हे, तर कलेचे धोरण. गोव्याच्या सांस्कृतिक धोरणामध्ये यातील बहुतांश गोष्टींचा समावेश आहे. परंतु त्याची परिपूर्णरित्या अंमलबजावणी झालेली नाही. ती झाली तर गोव्यात कला हाच एक प्रभावशाली सेवा उद्योग म्हणून उभा राहू शकतो. मात्र त्यासाठी शालेय अभ्यासक्रमापासून इफ्फीपर्यंतच्या सर्वच कलात्मक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोण आमूलाग्र बदलायला हवा. कलेकडे बघण्याची राज्यकर्त्यांची मानसिकताही बदलायला हवी. कला हा सेवा उद्योग म्हणून विकसित होवू शकतो ही जाणीव व्हायला हवी. त्याहूनही महत्वाचे म्हणजे कला म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे हे त्यांना उमजायला हवे. आमचे राज्यकर्ते जेव्हा केवळ मनोरंजन म्हणून कलेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोण बदलतील तेव्हाच हे शक्य होईल.

हे तसे अशक्य नाही. परंतु – शक्य आहे का?

(दैनिक हेराल्डमध्ये प्रसिद्ध)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs