विद्या निकेतनने हाती घ्यावे ‘मिशन सालसेत’

By Sandesh Prabhudesai
09 November 2012 00:07 IST

गोमंत विद्या निकेतन या गोव्यातील एका अग्रगण्य सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचा यंदा शतक महोत्सव झाला. 44 वर्षांपूर्वी, 1968 साली, उभ्या राहिलेल्या मडगावातील त्यांच्या इमारतीच्या नूतनीकरणाचा समारंभ या रविवारी संपन्न होत आहे. शंभर वर्षे एक संस्था अविरतपणे जे कार्य करीत आहे त्याला तोड नाही. तीसुद्धा पारंपारिक पद्धतीने नव्हे तर पुरोगामी विचारांचा वारसा चालवीत. नवनिर्माणासाठी अव्याहतपणे चाललेले विद्या निकेतनचे हे कार्य खरोखरच अचंबित करणारे आहे. खास करून आज जेव्हा राजकारण किचनमध्ये आणि बेडरूममध्येसुद्धा पोचलेले आहे त्या काळात सर्व प्रकारचे क्षुद्र मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने एखादी समविचारी संस्था चालविणे हे दिव्यच म्हणावे लागेल.

विद्या निकेतनचा इतिहासही तसा प्रेरणादायकच. 19 मार्च 1912 रोजी मडगावच्या सारस्वत समाजातील काही पुरोगामी विचारांच्या व्यक्तींनी एकत्र येवून ‘सारस्वत ब्राह्मण समाज’ या संस्थेची स्थापना केली. नाव सारस्वत समाज आणि विचार पुरोगामी हा तसा आज विरोधाभासच वाटतो. परंतु हे सर्वजण महात्मा आणि सावित्रीबाई फुले, धोंडो केशव कर्वे, गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारांनी भारावून गेले होते. स्वामी विवेकानंद व राजा राममोहन रॉय सारख्या विचारवंतांचा पगडा त्यांच्या मनावर होता. आचार्य धर्मानंद कोसंबी त्यांचे स्फूर्तीस्थान होते. त्या काळात स्मार्थ आणि वैष्णव सारस्वत आणि त्यांच्यामधल्या पोटजातीतील दुष्मनी शिगेला पोहोचली होती. अशावेळी संपूर्ण सारस्वत समाजाला एकत्र आणून पुरोगामित्वाकडे नेण्याच्या इराद्याने ही संस्था स्थापन झाली असे संस्थेचा इतिहास सांगतो. मात्र केवळ समाजबांधवांमध्ये आपले कार्य मर्यादित ठेवण्याऐवजी संपूर्ण समाजाला नवीन विचार देण्याचे कार्य या संस्थापकांनी केले. एका देवळातील दलित कीर्तनकाराच्या कीर्तनाला सनातनी लोकांनी विरोध केला तेव्हा ते कीर्तन समाजाने आयोजित करण्याचेही प्रकार या इतिहासात नमूद झालेले आहेत. त्याचाच परिपाक म्हणून गोवा मुक्तीनंतर या संस्थेचे साहिजिकच‘गोमंत विद्या निकेनत’ असे नामकरण झाले. कारण या संस्थेचा गाभा सारस्वत समाजापुरता मर्यादित कधीच नव्हता – तो सरस्वतीपूजकांचा होता. पुरोगामी विचारवंतांचा होता.

मडगाव ही केवळ दक्षिण गोव्याची राजधानी नव्हे. ती गोव्याची सांस्कृतिक राजधानी आहे. गोव्यातील कित्येक क्रांतिकारी घटना मडगावातूनच सुरू झाल्या. राम मनोहर लोहियांनी गोवा मुक्तीची विझत चाललेली क्रांती ज्योत 18 जून रोजी या मडगावातच पेटवली. गोव्याच्या अस्मिता रक्षणाची कोंकणी चळवळ या मडगावातूनच सुरू झाली. ओपिनियन पोलातून गोव्याचे अस्तित्व राखून ठेवण्यासाठी जनमत घडविणारे ‘राष्ट्रमत’ याच मडगावच्या ज्यार्दीनमध्ये जन्माला आले. कोंकणी भाशा मंडळाचा मडगाव हा आजही केंद्रबिंदू आहे. ‘नवें गोंय’ व ‘सुनापरान्त’ ही रोमी व देवनागरी कोंकणीतील दैनिके मडगावातूनच सुरू झाली. राजकीय बंधने झुगारून देवून स्वतंत्र विचारांच्या विद्यार्थी संघटना याच मडगावात जन्माला आल्या. शिवाय कित्येक लोकचळवळी, पुरोगामी विचारांची नियतकालिके यांचा गाभा मडगाव शहरातच पोसला गेला.

परंतु कालप्रवाहाबरोबर काही पुरोगामी बदल घडत गेले तेव्हा विद्या निकेतन ही संस्था मागे राहिली. संपूर्ण भारतातील अत्यंत यशस्वी असलेला तियात्र हा रंगमंच विद्या निकेतन भाड्याने घेवूनच जास्त बहरला. परंतु पुरोगामी स्वरुपाच्या कोंकणी चळवळीला वैचारिक दिशा देण्यात मात्र विद्या निकेतन मागे राहिली. आजही या संस्थेत अधिकृतरित्या होणारे कार्यक्रम अट्टाहासाने मराठीतच केले जातात. त्यामुळे काही प्रमाणात ही संस्था पुरोगामित्वाच्या प्रवाहात मागे पडलेली आहे. त्याहूनही महत्वाचे म्हणजे  स्वतःच्याच सासष्टी तालुक्याला दिशा देण्यात ही संस्था मागे पडली. मडगाव सोडल्यास सासष्टीच्या इतर गावातून ख्रिश्र्चन धर्मियांचा प्रभाव आहे. या ख्रिश्र्चन समाजाला डिनॅशनलाय्ज्ड संबोधण्यातच आम्ही जास्त धन्यता मानली. काही जणांची तर त्यांना अराष्ट्रीय म्हणण्यापर्यंत मजल गेली. हा केवळ धार्मिक एकोप्याचा प्रश्र्न नव्हे. पोर्तुगिजांच्या धार्मिक व सांस्कृतिक आक्रमणातून व खास करुन इन्क्विझिशनमधून गोमंतकियांची सांस्कृतिक पाळेमुळे उपट्न काढण्याचा प्रयत्न झाला होता. त्याचाच परिणाम म्हणून मडगाव शहर व त्याभोवतालची गावे यामध्ये एक वैचारिक व सांस्कृतिक दरी निर्माण झालेली होती. गोवा मुक्तीनंतर योजनाबद्धरित्या ती भरुन काढणे ही पुरोगामी विचारांच्या चळवळीची नैतिक जबाबदारी होती.

परंतु दुर्दैवाने गेल्या 50 वर्षांत ही सांस्कृतीक दरी भरून काढण्याचा योजनाबद्ध प्रयत्न झाला नाही. त्यामुळे ही दरी जास्तच रुंदावत गेली. कोंकणी-मराठी भाषावाद, कोंकण रेल्वे मार्गबदल, कोंकणीतला रोमी-देवनागरी वाद वा हल्लीच गाजलेला भाषा माध्यमाचा प्रश्र्न असे कुठलेही सामाजिक प्रश्र्न उपस्थित झाले की ही दरी आणखीनच रुंदावत जाते. ती भरून काढण्यापेक्षा आणखीनही वाढवत नेण्याचे काम करण्यातच आपण जास्त धन्यता मानतो. त्यावर मग राजकारणी आपली पोळी भाजून घेतात व संधीसाधू लीडर बनतात. पुरोगामी विचारांतून संपूर्ण गोमंतकीय समाजाला दिशा देणाऱ्या गोमंत विद्या निकेतनसारख्या संस्थासुद्धा मूग गिळून गप्प बसतात. त्यात भर म्हणून बिगरगोमंतकीयांविरुद्ध तयार झालेली धुसफूस व त्यातून मुसलमान समाजाविरुद्ध कलुषित स्वरुपाचा प्रसार करण्याचे काम याच मडगाव शहरात शिस्तबद्धरित्या चालू आहे. त्यामुळे आणखीन एक टाईम बॉम्ब या सांस्कृतिक राजधानीत टिकटिकत आहे. त्याचा भडका उडाला तर संपूर्ण गोवा त्यात होरपळून निघेल हे निश्र्चित. त्यामुळे सासष्टी तालुका हा आज भविष्यकालीन सांस्कृतिक ह्रासाचाही केंद्रबिंदू बनलेला आहे.

अशा परिस्थितीत पुरोगामी विचारांची गुढी खांद्यावर घेवून शंभर वर्षे पूर्ण करणाऱ्या गोमंत विद्या निकेतनसारख्या संस्थेवर एक ऐतिहासिक जबाबदारी आलेली आहे. नव्हे, या संस्थेकडून ती अपेक्षा आहे. हिंदू-ख्रिश्र्चन-मुसलमान अशा सर्व धर्मियांना एकत्र घेवून जाणे, तसेच गोमंतकीय व इथेच स्थायिक झालेले बिगरगोमंतकीय यांच्यात सांस्कृतिक एकरूपता निर्माण करणे हे सालसेत तालुक्यासमोरील आज प्रमुख आव्हान आहे. सालसेत तालुक्यात हा प्रयोग यशस्वी झाला तर साहजिकच त्याचे सकारात्मक पडसाद संपूर्ण गोव्यात उठतील. त्यासाठी विद्या निकेतनसारख्या प्रेरणादायक संस्थेची पाळेमुळे संपूर्ण सालसेत तालुक्यात पसरवणे महत्वाचे आहे. शैक्षणिक संस्थांच्या आधारे व गावागावातून पसरलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या आधारे हा कार्यक्रम हाती घेणे शक्य आहे. आतल्या आत धुमसणारा हा संस्कृतीसागर शांत करणे ही काळाची गरज बनलेली आहे. गोमंत विद्या निकेतन हा त्यासाठी महत्वपूर्ण असा दीपस्तंभ आहे. म्हणूनच ही प्रामाणिक अपेक्षा. विद्या निकेतनने आता हाती घ्यावे - मिशन सालसेत.

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

"मडगाव ही केवळ दक्षिण गोव्याची राजधानी नव्हे. ती गोव्याची सांस्कृतिक राजधानी आहे. "

What is the meaning of this sentence?

What is your definition of सांस्कृतिक राजधानी?

- JayGoa, Goa | 11 th November 2012 05:43

 

तुमचा लेख वाचून माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले. कदाचित ते माझ्या अज्ञानापोटी असतील आणि कुणीतरी सारस्वत विचारवंत त्यावर भाष्य करेल अशी अपेक्षा आहे. राजकारण , अर्थकारण आणि समाजकारण यांचा एक दुसऱ्याशी चपखल मेळ बसलेला असतो आणि त्या दृष्टीकोणातून पाहिल्यास ज्ञाती संस्थांच्या इतिहासातून बोध घेणारे थोडेच असतात, बाकी सगळे उथळपणे आपापल्या कुवतीनुसार आणि वैयक्तिक फायद्यावर डोळा ठेवून भाटगिरी आणि हुजरेगिरी करण्यात धन्यता मानतात.

१. आजमितीस गोमंत विद्या निकेतन या मठग्रामातील संस्थेचे किती गैर सारस्वत अध्यक्ष झाले?

२. तुम्ही येथे नव्यानेच स्थायिक झालेल्या मुसलमान समाजाविरुद्ध चाललेल्या कलुषित प्रचाराचा उल्लेख केलाय परंतु इतक्या वर्षात हिंदू आणि ख्रिस्चन समाजातील दरी मिटवण्याचे किती प्रयत्न या संस्थेकडून झाले ?

३. पुरोगामी विचार धारेची गुढी खांद्यावर मिरवणारे सद्याचे अध्यक्ष, मनोहरबाब सत्तेवर आल्यापासून एवीतेवी बेकार आहेत व त्यांना समतेचा पुळका अधून मधून येतच असतो. ते या ' दिपस्तंभात ' कोणते दिवे लावणार आहेत?

४. दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे ही थोर परंपरा जपणारे मठग्रामातील कट्टर सनातनीही या संस्थेत कार्यरत आहेत जे खासगी जीवनात आपल्या बामणपणाचा प्रचंड अहंभाव बाळगतात त्यांची खोड कोण मोडणार?

५. गोयातील बामणामध्ये असलेल्या वृथा गर्विष्ठपणाला दूर करून त्यांच्यात इतर जातीविषयी प्रेम आणि आपुलकी वृद्धिंगत करण्याचे आव्हान सर्वात मोठे आहे आणि याची सुरवात म्हणून या संस्थेने गोयातील समस्त देवळे सर्व जातीसाठी खुली करण्याची मोहीम राबवून गोव्याच्या अस्मितेचा एकसंध आविष्कार करणे समर्पक नाही का?

- Rajan Kamat, Feira Alto, Mapusa | 10 th November 2012 12:49

 

Kai ho Sandesh, hal'likadde pushkall marathi lekhan kartaat... Bhashavaad sampla ka? Tumch' konknni lekhan suddha chann aste...marathicha virodh karat nahi, pann kadhi kadhi Konknnit pann lekhan kara....ki, ata kaal badal'la tashe tumhi pun badal'le? Havaa vhavtte tasa sup pakdaat nahit na?

Bhaxa veggli vaparli mhunnon vichar bhadal'lele disat nahi. evdhach ki hal'li kadde, marathi samzaila vell lagto, anik tumche lekh n'vacha sodaila vichitr vaat'te

Keep writing

- Jaret Chandrapurkar, Chandor | 09 th November 2012 06:18

 

Related Blogs