नुकसानग्रस्तांना भरपाई नाही?

By Sandesh Prabhudesai
12 October 2012 22:52 IST

गोव्यातील खाणी बंद केल्यामुळे हजारो लोकांचे नुकसान झालेले आहे तेव्हा त्यांना नुकसानभरपाई द्यावी असा एकमुखी सूर सर्वत्र ऐकू येत आहे. वाद आहे तो केवळ ही नुकसानभरपाई कोणी द्यावी यावर. काही लोक म्हणतात गोवा सरकारने द्यावी. गोवा सरकार म्हणते केंद्र सरकारने त्यासाठी एकरकमी पॅकेज द्यावी. तर ट्रक व बार्जवाले म्हणतात सरकारला परवडत नसेल तर 35,000 कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या खाणमालकांकडून वसूल करून द्यावी. सगळ्याच खाणी बंद झाल्यामुळे सुक्याबरोबर ओले जळण्याचाही प्रकार या खाणकाम बंदींमुळे झालेला आहे. त्यामुळे कायदेशीर खाणकामात गुंतलेले ट्रकवाले, बार्जवाले व कामगारवर्गावरही बेकारीची कुह्राड कोसळलेली आहे यात संशयच नाही. परंतु कोण कायदेशीर व कोण बेकायदेशीर ते अजूनपर्यंत कोणीच ठरवलेले नाही. त्यासाठी कोणती प्रक्रियाही अजूनपर्यंत सुरू झालेली नाही. त्यामुळे ही नुकसानभरपाई केवळ कायदेशीर खाणकामात गुंतलेल्यांना मिळेल की बेकायदेशीर खाणकामातीलही लोकांना हे कळण्यास सध्या तरी मार्ग नाही.

ज्या अहवालाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील संपूर्ण खाणकामावर बंदी आणलेली आहे त्या न्यायमूर्ती शहा अहवालाच्या मते बेकायदेशीर खाणकाम म्हणजे मुळात चोरीचा गुन्हा आहे. तसे असल्यास चोरी पकडल्यावर आपण काय करतो? चोराला पकडून तुरुंगवासाची शिक्षा ठोठावतो, त्याचा चोरीचा माल जप्त करतो आणि या चोरीच्या मालाची वाहतूक करणारी वाहने, चोरीचा माल विकत घेणारी दुकाने वगैरेंना सील ठोकतो. त्यांच्यावरही गुन्हा दाखल करतो. आता या खनिजमालाच्या चोरीत खुद्द गोवा सरकारने काय केले? चोर मोकळेच आहेत. चोरीचा माल परस्पर विकण्याची चोरांना परवानगी दिली (सर्वोच्च न्यायालयाने मात्र त्यावर बंदी आणली). शिवाय या चोरकामात मदत करणाऱ्यांना नुकसानभरपाई देण्यावर सध्या खल चालू आहे. अर्थात, ही चोरी पकडताना प्रामाणिकपणे मालाची विक्री करणाऱ्यांच्याही कामावर बंदी आलेली आहे. त्यांच्यावर कदापी अन्याय होता कामा नये. त्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे. त्याबद्दल वादच नाही.

परंतु सरकारचा कारभार अजबच आहे. खाणकामावर बंदी आणल्यामुळे किती ट्रकवाल्यांचे आणि बार्जवाल्यांचे नुकसान झाले त्याचा अहवाल तयार करण्यासाठी सरकारने भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची एक समिती नेमलेली आहे. कोणते आमदार आहेत या समितीवर? एकूण एक सगळे खाणकामाच्या धंद्यात गुंतलेले. त्यातील गेली 30-40 वर्षे या धंद्यात असलेले किती? एकही नाही. बेकायदेशीर खाणकाम सुरू झाल्यापासून या धंद्यात उतरलेले किती? बहुतेक सगळेच. त्यातील काहीजण तर स्वतःच ट्रकमालक वा बार्जमालक आहेत. आता हे लोक नुकसानभरपाईचे हकदार कोण ते ठरवणार? शहा कमिशनच्या मते सगळ्याच खाणी बेकायदेशीर आहेत. त्या न्यायाने गेल्यास मग सगळेच ट्रकवाले व बार्जवाले बेकायदेशीर कामात मदत करून स्वतःची कमाई करणारे ठरतात. परंतु या बेकायदेशीर प्रकरणातील कित्येक प्रकरणे ही नियमभंगाची आहेत. त्यांची लीज कायदेशीर आहेत. तेव्हा या संपूर्ण बेकायदा कामाची छाननी होवून कोण कायदेशीर आणि कोण बेकायदेशीर ठरेपर्यंत कायदेशीर खाणकामात गुंतलेल्यांवर अन्याय होईल. तेव्हा त्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे. परंतु संन्यासी सोडून चोरांनाच नुकसानभरपाई देण्याचा प्रकार तर होणार नाही ना याची खबरदारी घेण्याची कोणतीही पावले उचललेली दिसत नाहीत. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.

आता आपण त्याहूनही महत्वाच्या गोष्टीकडे वळूया. का आणली सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण खाणकामावर बंदी? का केले केंद्रसरकारनेही तत्पूर्वी खाणकाम निलंबित? का केले गोवा सरकारनेही खाणकाम काही काळासाठी निलंबित? आमच्याच धोरणानुसार सर्वोच्च न्यायालयाने बंदीचा आदेश दिलेला आहे असा बडेजाव का मिरवला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी? कारण हा संपूर्ण प्रकारच बेकायदेशीर होता. त्यामुळे केवळ चोरीच होत नव्हती तर नैसर्गिक संतुलन सांभाळण्याचे नियम धाब्यावर बसवून निसर्गाचा ह्रास करीत खाणकाम चालले होते. त्याचा परिणाम म्हणून निसर्गसंपत्तीचे नुकसान होत होते. शेता-भाटांचे नुकसान होत होते. गावच्या गावे बेचिराख होत होती. चिलटे मरावीत तशी रस्त्यावरून जाणारी माणसे ट्रकांखाली चिरडली जात होती. प्रमाणाबाहेरील खाणकामाच्या प्रदूषणामुळे लोक रोगग्रस्त होत होते. हवा आणि पाणीही प्रदूषित होत होते. हे मानवी जीवनाचे नुकसान नाही का? हे नुकसान गोव्यात कित्येक वर्षे होत आहे, हल्ली बेकायदेशीर खाणकामानंतर हे नुकसान कित्येक पटींनी वाढलेले आहे आणि हे खाणकाम असेच चालू राहिले तर हे नुकसान चालूच रहाणार आहे. या नुकसानाची भरपाई कोण देणार?

खाणकामावर बंदी आणल्यामुळे एका पिढीचे आणि बेकायदा कामात गुंतलेल्यांचे नुकसान होत आहे म्हणून त्यांना सरकारी नुकसानभरपाई देण्यावर सध्या प्रचंड उहापोह चाललेला आहे. परंतु ज्या खाणकामामुळे लोकांचे जीव गेले, ज्यांची शेते-भाटे गेली, उदरनिर्वाह गेला आणि कित्येक पिढ्यांचा नाश करणाइतपत  निसर्गाच्या ह्रास झाला त्या नुकसानाबद्दल कोणी बोलतही नाही आणि त्यांना भरपाई देण्याविषयीही विचार करत नाही. उलट या बेकायदेशीर प्रकरणांना वाचा फोडणाऱ्या व्यक्ती आणि एनजीओंना मात्र जाहीररित्या दोष दिला जात आहे. त्यांचे म्हणणे खरे आहे म्हणूनच तर काँग्रेसवाल्या जयंती नटराजन, भाजपावाले मनोहर पर्रीकर आणि सर्वोच्च न्यायालयाने मागेपुढे न पाहता खाणकाम बंद केले ना? तरीही त्यांच्या नावाने शंख करणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला सुळी देण्याचाच हा प्रकार झाला. काय लक्षात आणून दिले आहे त्यांनी आमच्या? बेकायदेशीररित्या जंगलात घुसून खाणी खणल्या. त्यासाठी नैसर्गिक संतुलनाचे सर्व नियम धाब्यावर बसवले. शेता-भाटात खाणीची माती जाईपर्यंत अनिर्बंध खाणकाम केले गेले. 55 टक्के गोमंतकीय ज्या साळावलीच्या पाण्यावर जगतात आणि 34 टक्के ओपाच्या पाण्यावर जगतात त्या पाण्याच्या क्षेत्रात खाणकाम करून आमचे पिण्याचे पाणी प्रदूषित केले गेले. समुद्रपातळीच्याही खाली जावून खाणकाम केल्याने खारे पाणी गांजे-उसगांवच्याही पुढे पोचले आणि आमचे गोड्या पाण्याचे झरे, विहिरी आणि ओहोळ प्रदूषित झाले. त्यामुळे आजचीच नव्हे, तर यापुढच्याही कित्येक पिढ्यांना जगणे मुष्किल होईल अशी परिस्थिती सध्या आहे. आणि आम्ही सर्वजण प्रदूषित पाणी रोज पीत आहोत. हे नुकसान नव्हे का?

खाणकाम बंद झाल्यामुळे कायदेशीर खाणकामात गुंतलेल्यांवर बेकारीची कुह्राड कोसळलेली आहे, तेव्हा तेवढेच लोक शोधून काढून त्यांना नुकसानभरपाई द्यायलाच हवी. परंतु त्याचबरोबर खाणकामामुळे ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांनाही नुकसानभरपाई मिळायला हवी. तेव्हाच हे सरकार लोकाभिमुख आणि न्यायप्रिय वाटेल. अन्यथा दुर्दैवाने म्हणवे लागेल – नव्या बाटलीत जुनीच दारू!!!

(दैनिक हेराल्ड मध्ये प्रसिद्ध)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

तुम्ही जी परिस्थिती मांडली आहे त्याच्यापेक्षाहि विदारक स्थिती मी माझ्या डोळ्यांनी खाणग्रस्त गावातून बघितली आहे. परंतू राजकारण आणि सत्ता संपादन या भोवती केंद्रित झालेल्या धन दांडगया माफिया समोर झुकलेला मुख्यमंत्री आपल्या साफ आणि नीतिमान विचार धारेविषयी कितीही टाहो फोडत असला तरी तो त्यांच्या हातातले बाहुले आहे हे विसरून चालणार नाही. निवडणूक होण्या आधी या सर्व खाण उद्योगातील नवीन खलनायकांच्या जुन्या जाणत्या धेंडा बरोबर इंडिया International Centre मध्ये नियमित पार्ट्या व्हायच्या आणि त्यात दिगंबर सरकार पाडून नवीन दलाल नियुक्त करण्याविषयी खल व्हायचा कारण दिगंबर आपल्या स्वार्थापोटी त्यान्च्यापेक्षा गब्बर झाल्याने त्यांना डोईजड ठरत होता. या बैठकांना हजेरी लावणारे काही महाभाग आज सत्तेची फळे चाखत आहेत आणि काही पडद्यामागे राहून सूत्रे हलवत आहेत.

मनूच्या राज्यात विरोधकांना सळो कि पळो करून सोडण्याचे धोरण असल्याने कट्टर पंथीय विचारसरणीचा नेता समर्पक पणे सगळ्या विरोधी शक्तींचा बिमोड करेल असा त्यांचा आशावाद . परंतू Goa Foundation च्या नावाने माशी शिंकली. क्लौड अल्वारेस आणि रमेश गावसच्या रूपाने त्यांच्यासमोर एक नवीन संकट उभे राहिले. हे त्यांना संपूर्णपणे अज्ञात होते. Goa Bachao Abhiyan ची हवा जवळ जवळ निघालेली आणि नव्याच्या नवलाईबरोबर जनता नवीन प्रेषिताच्या जयघोषात खाण व्यावसायिकांची बटिक बनलेल्या मीडियाच्या तालावर पैशांनी खरीदलेल्या गाजराच्या पुंगीवर डोलू लागेल असा त्यांचा भ्रम पण हा भ्रमाचा भोपळा फुटला आणि त्यांच्यामागे नवीन शुक्लकाष्ठ लागले.

संपादक साहेब तुम्ही फारच भाबडे वाटता . कदाचित काणकोण च्या मातीतील भाबडेपणा अजूनही तुमच्यात शिल्लक आहे . इकडे पिढ्यांचा आणि गोव्याच्या भविष्याचा विचार करायला कुणाला सवड आहे? पांच वर्षे पूर्ण करून पुढच्या पांच वर्षात आपली सत्ता आणि संपदा कशी टिकेल या पलीकडे गेलेला एकही यशस्वी नेता तुम्ही गोयात दाखवा (भाऊ / Jack Sequeira सोडून) .तुम्ही कशाला कंठशोष करता? हे कॉंग्रेस आणि BJP वाले एकाच माळेचे मणी. स्वताच्या आईला गहाण ठेवून बापाला ठेचणारे. त्यांच्याकडून कसली अपेक्षा ठेवता? गोव्यात आज विकले न गेलेले विचारवंत दिसणे अवघड आहे आणि त्यामुळे समाज भरकटत आहे. दुखणे फार गंभीर आणि उपाय तर दृष्टी पथात दिसत नाही . पण या राखेतुनही काही नवीन उगवेल अशी आशा आहे कारण जनता शहाणी होतेय आणि नवीन प्रश्न विचारतेय. तुम्ही तुमचा भाबडेपणा सोडू नका एक दिवस परिस्थिती बदलेल हीच एक आशा.

- Rupesh Jhalmi, Malbhat, Margao | 13 th October 2012 11:03

 

Related Blogs