ही कसली वेल्फेअर स्टेट?

By Sandesh Prabhudesai
06 October 2012 23:11 IST

काणकोण तालुक्यातील लोलये हा माझा गाव. बाजूलाच गालजीबागचा समुद्रकिनारा आणि गावात तर कित्येक खडकाळ आणि छोटे छोटे सुंदर समुद्रकिनारे. नदी, नाले, कुळागरे, माडांचे बांध, जंगल सगळे काही गोव्याचे लँडमार्क या एकाच गावात आहेत. त्यादृष्टीने गोव्यातील एक विरळाच गाव. या गावात पर्यटनाच्या नावाने रिसोर्ट घालण्याचे प्रयत्न झाले, बॉक्साईट मायनिंगचे प्रयत्न झाले, जंगलच्या जंगल खरेदी करून वनसृष्टी नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. जागृत गांवकऱ्यांनी सर्व प्रयत्न हाणून पाडले. परंतु त्याला पर्यायी अर्थव्यवस्था तयार झाली नाही. त्यामुळे परिस्थितीशी झगडून शिकलेल्या बहुतेक सर्वांनाच गाव सोडून पोटापाण्यासाठी बाहेरगावी जावे लागले. या सुशिक्षित गावाने गोव्यातला पहिला आयएएस् आणि आयपीएस् अधिकारी धरून विविध क्षेत्रातील कित्येक रथी महारथी गोव्याला, देशाला आणि जगालासुद्धा दिले. मात्र याचा परिणाम म्हणून हुषारी सगळी बाहेरगावी गेली.

गेल्याच वर्षी एन्आयटीसारखा शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाकांक्षी प्रयत्न आमच्या गावात येण्याचा प्रस्ताव आला. दुर्दैवाने गांवकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवून ग्रामसभेत या प्रकल्पाला विरोध करण्यात आला. एवढी वर्षे कित्येक विनाशकारी प्रकल्पांना विरोध करणाऱ्या गावात एक कल्याणकारी प्रकल्प येत होता तोही जातो की काय अशी भीती निर्माण झाली. लगेच गावाबाहेर असलेले सगळे जागृत लोलयेकर एकत्र आले. त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून प्रकल्पाविषयी जाणून घेतले आणि एन्आयटीचा हा प्रकल्प गावातच व्हावा असा निर्णयही घेतला. आमच्या गावचे एक इंजिनियर फोंड्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून निवृत्त होवून गावात परत स्थायिक झालेले आहेत. विश्वास प्रभुदेसाय. त्यांनी यावेळी बोलताना एक भेदक सत्य आम्हासमोर ठेवले – या कल्याणकारी प्रकल्पाला पाठिंब्यापेक्षा विरोध होण्याचे एक कारण म्हणजे गावात तयार झालेला इंटेलेक्चुअल व्हॅक्यूम. बुद्धिजिवी पोकळी!

इंटेलेक्चुअल व्हॅक्यूमच्या या सत्यकथित विचाराने मी हादरलो. विचार करणारी माणसे परिसरात नसली तर संधीसाधू लोक अविचार पसरवून व दिशाभूल करून परिसराचे कसे नुकसान करू शकतात ते मी माझ्या गावातच पहात होतो. त्याचबरोबर हीच विचारी माणसे गावात असल्याने आमचा गाव विनाशापासून कसा वाचवला गेला होता तेही लहानपणापासून पाहिले होते. मुक्तिलढ्याच्या रोमांचकारी कहाण्या तर सर्वच जाणत्यांकडून ऐकल्या होत्या. तोच दृष्टिकोण घेवून मी सहजच संपूर्ण गोव्याकडेच पहायला लागलो. तर काय? जे चित्र माझ्या गावात तेच उद्या गोव्यात तयार होईल की काय अशी परिस्थिती दिसायला लागली. या गोव्याने विविध क्षेत्रातील शेकडो आणि हजारो इंटेलेक्चुअल्स (बुद्धिजिवी) तयार केलेले आहेत. विज्ञानापासून कला आणि क्रीडापर्यंत कित्येक क्षेत्रात. बहुतेक सर्वांनीच बाहेरगावी जावून नाव कमावले. परंतु गोव्यात परत येवून इथेच स्थायिक होवून आपले कार्यक्षेत्र वाढविणारे रेमो फॅर्नांडीस आणि वेंडल रॉड्रिक्ससारखे अवघेच. आज तर इथले बुद्धिजिवी बाहेर जाण्याच्या प्रमाणात अनपेक्षितरित्या प्रचंड वाढ झालेली आहे. हा प्रकार असाच चालू राहिला तर पुढच्या दहा-वीस वर्षांत गोवा संपूर्णरित्या अविचारी लोकांच्या हातात तर जाणार नाही ना अशी भिती वाटणे साहजिकच.

कारण इथे निर्माण होणाऱ्या बुद्धिजिवींना इथे ठेवण्याची ताकद इथल्या राज्यव्यवस्थेने तयार केलेली नाही. उलट आयटी हॅबिटॅट वा कारखान्यांवर लक्ष केंद्रित करून गोव्याशी नाते नसलेल्यांना बाहेरगावातून इथे आणण्याचाच प्रकार अव्याहतपणे चालू आहे. म्हणूनच तर प्रादेशिक आराखड्याच्या नावे गोवा विकायला काढला गेला होता तेव्हा गोव्यात अजून बाकी राहिलेल्या विचारवंतांना पाच वर्षांपूर्वी पुढाकार घेवून त्याविरुद्ध आंदोलन उभारावे लागले होते. पण त्याच गोव्यात बेकायदेशीर मायनिंग कायदेशीर करा आणि इथल्या निसर्गसंपत्तीचा नाश झाला तरी ती कायदेशीर करा अशी मागणी चक्क शहा कमिशनसमोर करणारी अपप्रवृत्ती फार मोठ्या प्रमाणावर तयार झालेली याच गेल्या पाच वर्षांत आपण बघितली. आजही मायनिंगच्या नावे गोव्याची जंगले नष्ट करतानाच खनिजयुक्त पाणी पिण्याची पाळी आम्हावर आलेली असतानासुद्धा बेकायदेशीर मायनिंग बंद केल्यावर “बेकारीची कुह्राड” कोसळलेल्यांच्या नावे टाहो फोडणारेच जास्त दिसतात. बेकायदा व्यवहारात गुंतलेल्यांचे पुनर्वसन करण्याचा खटाटोपच जास्त दिसतो. दूरदृष्टीने विचार करून कल्याणकारी गोव्याचा विचार करण्याची प्रवृत्तीच नष्ट झाली आहे की काय असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती दिसते आहे.

त्यात मनोहर पर्रीकर सरकारने तर कल्याणकारी योजनांच्या नावे केवळ पॉप्युलिस्ट योजनांचाच सपाटा जास्त लावलेला आहे. दयानंद सुरक्षा सामाजिक योजना, लाडली लक्ष्मी, गृह आधार योजना अशा कित्येक योजनांचा माराच सुरू झालेला आहे. दयानंद सुरक्षा सामाजिक योजनेचा मूळ उदात्त हेतू कुठल्या कुठे गुल झालेला आहे. लाडली लक्ष्मी योजना म्हणजे तर खर्चिक लग्नसमारंभांना उत्तेजन देणारी सरकारी हुंड्याची योजना आहे. राजकीय लागेबांधे असणाऱ्यांचीच यात चंगळ होणार आणि गरजू लोक या योजनांपासून वंचितच रहाणार की काय अशी प्रश्नचिन्हे तयार होण्यासारख्या पद्धतीने या कल्याणकारी योजनांची राजकीय पद्धतीने अंमलबजावणी चालू आहे. मात्र जे हुषार युवक-युवती गोव्यात राहिल्यास या गोव्याचे आपसूकच कल्याण होईल त्यांना गोव्यात ठेवण्यासाठी तयार केलेली कसलीही योजना दिसत नाही. सगळा काही चकचकाट. मात्र दिव्याखाली संपूर्ण अंधार!

मायनिंग हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे हा विचार सातत्याने आम्हावर बिंबवला गेला. त्यानंतर पर्यटन हा कण्याचा दुसरा भाग मानण्यात आला. प्रत्यक्षात त्या नावाने बेकायदेशीर माननिंगचा उद्रेक झाला तर विकृत पर्यटनाने गोव्यात कळस गाठला. गोव्यात तयार झालेल्या हुषार व चुणचुणीत युवकांना यात कुठेही स्थान नव्हते. आजही नाही आहे. त्यामुळे गोव्याविषयी आस्था असूनसुद्धा केवळ योग्य ती संधी नसल्याने त्यांना बाहेरगावी जावे लागत आहे. प्रत्यक्षात सेवा उद्योग हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनलेला आहे. ही अर्थव्यवस्था उभारण्यासाठी बिगरगोमंतकियांचे लोंढेच्या लोंढे गोव्यात येत आहेत. गोव्यातील सर्जनशील आणि विचारवंतांचे लोंढेच्या लोंढे मात्र आपले नशीब अजमावण्यासाठी बाहेरगावी जात आहेत. हेच आहे का गोव्याचे कल्याण?  हेच आहे का आमचे कल्याणकारी राज्य? यालाच म्हणायचे का आपण वेल्फेअर स्टेट?  हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावणे हेच आहे  का आमचे दूरदृष्टी व्हिजन?  आणि त्यावर स्वार होवून भरधाव दिशाहीन दौडणार राज्यकर्ते आमचे व्हिजनरी?

(दैनिक हेराल्ड मध्ये प्रसिद्ध)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

Aapli chikitsa yogya ahe pan je ahet tya budhijivinchi ani vicharvantachi magchya ani atachya sarkarane kay kimat keli, thode chamche sodun, te vichara- ani Dr. harischandrabab Nagvenkara sarkhyanahcya margadarshanane karyanvit zaleli paramparik 80000 gomantakiya vyvasayainkana pay tikavun dharnyas madat karanari "Goenche daiz' hi smaj kalyan khtayachi yojana hya budhvant sarkarne pudhe ka neli nahi?. Mukhyamantrayana tar asha gambhir vishayavar bolayala pandhra minitesuda deta yet nahit he apale durbhagya ahe-

- Nandkumar Kamat, Calapur, goem | 07 th October 2012 01:14

 

Related Blogs