स्थलांतरणः आग रामेश्र्वरी, बंब सोमेश्र्वरी?

By Sandesh Prabhudesai
09 September 2012 21:27 IST

बाहेरून येणाऱ्या बिगरगोमंतकीय स्थलांतरितांचा लोंढा थोपविला पाहिजे व गोव्याची लोकसंख्या गोठविली पाहिजे असे वक्तव्य मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हल्लीच केल्याने पुनश्र्च एकदा बिगरगोमंतकियांच्या प्रश्र्नावर जाहीर चर्चा सुरू झालेली आहे. तसा हा प्रश्र्न नवा नसला तरी खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यावर भाष्य केल्याने या आतल्या आत खदखदणाऱ्या प्रश्र्नाला पुनश्र्च एकदा वाचा फुटलेली आहे. अन्यथा या प्रश्र्नाचे वस्तुनिष्ट आकलन केले नसल्याने 1984 मध्ये वास्कोमध्ये उसळलेली दंगल आपण पाहिली आहे आणि आजही आपण तेच करीत आहोत. थोडक्यात आग रामेश्र्वरी आणि बंब सोमेश्र्वरी अशीच या प्रश्र्नाची अवस्था आहे.

2011 च्या जनगणनेनुसार गोव्याची लोकसंख्या आहे साडे चौदा लाख. प्रत्यक्षात ही लोकसंख्या साडे पंधरा लाखांवर जाईल असा अंदाज वर्तविला गेला होता. हे अंदाज चुकले आहेत ते केवळ बिगरगोमंतकियांच्या स्थलांतरामुळे. 1950 ते 1960 या दहा वर्षांत गोव्याची लोकसंख्या केवळ आठ टक्क्यांनी वाढली होती. परंतु 1971 च्या जनगणनेत मात्र ती 35 टक्क्यांनी वाढली. म्हणजे 1950 मध्ये गोव्याची लोकसंख्या होती 5.47 लाख, 1960 मध्ये सहा लाख तर 1971 मध्ये ती झाली आठ लाख. 1981 मध्ये तर ती दहा लाख पार करून गेली. तब्बल 27 टक्के वाढ. आता 2011 पर्यंत 15 टक्क्यांनी लोकसंख्या वाढेल असा अंदाज होता. परंतु प्रत्यक्षात फक्त आठ टक्केच लोकसंख्या वाढली. याचाच अर्थ लोकसंख्या वाढ नियंत्रणात येत आहे. बिगरगोमंतकियांचे लोंढे रोडावले आहेत. इथे स्थायिक झालेले बिगरगोमंतकीयसुद्धा आपापल्या गावी परत जायला लागले आहेत. ही आहे राष्ट्रीय स्वयंरोजगार योजनेची (नारेगा) कमाल.

याचा अर्थ बिगरगोमंतकियांच्या लोंढ्यांची चिंता करण्याचे कारण नाही असे अजिबात नाही. परंतु गोव्यात आजमितीला चार प्रकारांची स्थलांतरे होत आहेत. त्यातली दोन गोव्यात झालेली बिगरगोमंतकियांची स्थलांतरे, तर दोन गोमंतकियांची बाहेर होणारी स्थलांतरे. परंतु आपण केवळ बिगरगोमंतकीय कामगार व छोट्या व्यापारी वर्गाच्या नावे बोटे मोडत आहोत. आजच्या घडीला गोव्यात किमान पाच लाख बिगरगोमंतकीय असावेत हा खुद्द मुख्यमंत्र्यांचा अंदाजही बरोबर आहे. परंतु या बिगरगोमंतकियांमध्ये फरक आहे. 1960 वा 80 पर्यंतच्या दशकांमध्ये स्थलांतरित होऊन इथेच स्थायिक झालेल्या बिगरगोमंतकियांची दुसरी वा तिसरी पिढी इथे वाढत आहे. ती पूर्णतया गोमंतकीय झालेली आहे. तसे आपण 95 टक्के गोमंतकीय बिगरगोमंतकीयच आहोत. गावडा, कुंळबी व वेळीप समाज सोडला तर इतर सर्व गोव्यात बाहेरूनच आले. गोव्याने 16 राजवटी बघितल्या आणि त्यांच्याबरोबर इथे येऊन स्थायिक झालेले आजचे नीज गोंयकार. त्या दृष्टीने बघितल्यास 20-30 वर्षांपूर्वी येऊन इथे स्थायिक झालेल्यांनाही आपण नीज गोंयकारच म्हणायला हवे एवढे ते इथल्या संस्कृतीमध्ये समरस झालेले आहेत.

दुसरी गोष्ट म्हणजे जी कामे आपण गोमंतकीय करायला तयार नाही ती करण्यासाठी बिगरगोमंतकीय कामगार वर्ग येतो. तसेच सेवा उद्योगात मोडणारे छोटे व्यापारधंदे व व्यवसाय करण्याच्या ज्या संधी आपण आंधळेपणाने हुकवत आहोत ते करणारे बिगरगोमंतकीय. या दोन्ही प्रकारच्या तथाकथित बिगरगोमंतकियांची गोव्याला आज नितांत गरज आहे. यातले बहुतेक बिगरगोमंतकीय झोपडपट्ट्यांमध्ये राहतात हा निव्वळ गैरसमज आहे. काही वर्षांपूर्वी बिगरगोमंतकीय कामगार वर्गाचे सर्वेक्षण करून ‘शॅडोस इन द डार्क’ नावाचे एक पुस्तक प्रशांती तळपणकार यांनी लिहिले होते. त्यानुसार केवळ आठ टक्के बिगरगोमंतकीय झोपडपट्यांमध्ये राहतात. 16 टक्के स्वतःच्या घरात राहतात तर 55 टक्के भाड्याच्या खोल्यांतून. तेही एकेका खोलीत 10-12 जणसुद्धा. यातील 42 टक्के लोक कोंकणी बोलतात तर 52 टक्के लोक शीत-कडी जेवतात. 66 टक्के लोकांना इथेय स्थायिक व्हायचे आहे तर 96 मुले गोवा सोडायला तयार नाहीत. गोव्यासाठी नितांत गरजेचा असलेल्या या कामगारवर्गाला पूर्णतया उपेक्षित ठेवून स्वतःला सुसंस्कृत म्हणायला निदान मी तरी तयार नाही. त्यांना सर्व प्रकारच्या साधनसुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर एक दिवस आपण करीत नसलेली कामे करायला आपणाला कामगार मिळणार नाहीत हे लक्षात ठेवावे.

गोव्याला खरी भीती आहे ती गोव्याला केवळ हॉलिडे होम समजून इथला निसर्ग लुटायला व स्वतःच्या मजेखातर इथल्या संस्कृतीचा ह्रास करण्यासाठी इथे येणाऱ्या बिगरगोमंतकियांची. हा वर्ग जेवढा सुशिक्षित आहे तेवढाच गब्बर आहे. तो गोव्य़ाकडे केवळ छानछौकीचे ठिकाण म्हणून बघतो. इथल्या भाषेशी, संस्कृतीशी, लोकांशी व गोव्याशीही त्यांना काहीही देणेघेणे नाही. बिगरगोमंतकीय कामगार एकेका खोलीत पाच-सहाजण रहातात. परंतु या गब्बर बिगरगोमंतकियांनी पाच-सहा खोल्यांचे फ्लॅट वा बंगले घेवून गोव्याची जमीन बळकावलेली आहे. 2011 मध्ये केलेले जनगणनेचे आकडे बघून तरी आपले डोळे उघडतील ही अपेक्षा. या आकडेवारीनुसार संपूर्ण भारतात केवळ सात टक्के घरे रिकामी आहेत. परंतु गोव्यात 22 टक्के घरे रिकामी आहेत. गोव्यात एकूण घरे आहेत साडेचार लाख. त्यातील 1.25 लाख रिकामी आहेत. या रिकाम्या घरांवर अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय गोवा सरकाराने घेतला आहे खरा. परंतु हा कर सहजरित्या भरण्याची ताकद असलेला हा वर्ग आहे. या बिगरगोमंतकियांना रोखण्यासाठी सरकारचे धोरण काय ते महत्वाचे आहे. कारण त्यांना गोव्याच्या संस्कृतीचे वा  भल्या-बुऱ्याचे कोणतेही सोयरसुतक नाही.

याहून गंभीर प्रश्र्न आहे तो बाहेरगावी जाणाऱ्या गोमंतकीय तरुण वर्गाचा. एका बाजूने संस्कृतीहीन तथाकथित सुशिक्षित वर्ग गोव्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूने सुशिक्षित व हुषार तरुण वर्ग इथे संधी नसल्याने बाहेरगावी जात आहे व तिथेच स्थायिक होत आहे. हे सुशिक्षित तरूण ही आपली खरीखुरी धनसंपत्ती आहे. परंतु ती वाढण्याची कसलीच साधने गोव्यात नाहीत. त्यांनी गोव्यातच रहावे यासाठी कोणतीही योजना आजपर्यंत कोणत्याही सरकारने आखलेली दिसत नाही. त्यामुळे येत्या दहा वर्षांत गोव्यात इंटेलेक्चुअल व्हॅक्यूम (बुद्धिजिवी पोकळी) तयार झाली तर त्यात नवल वाटून घेऊ नये. आणि गोव्याची सांस्कृतिक पातळी खालावली आहे म्हणून कोणी आक्रोशही करू नये.

आणखीन एक भयावह स्थलांतरण गोमंतकियांचे होत आहे ते म्हणजे पोर्तुगीज पासपोर्ट करून नोकरी-धंद्यासाठी युरोपला जाण्याचे. आजपर्यंत परदेशी नोकरी-धंद्यासाठी जाणारे गोमंतकीय आपली मिळकत घेऊन गोव्यातच परत येत. परंतु युरोपमध्ये आपले नशीब फुलेल म्हणून भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून गोमंतकीय कुटुंबेच्या कुटुंबे स्थलांतरीत होत आहेत. अजूनपर्यंत याविषयी आकडेवारी हाती येत नसली तरी दर दिवशी किमान 40 ते 50 असे पासपोर्ट केले जातात. गेली चार-पाच वर्षे अव्याहतपणे चाललेली ही प्रक्रिया लक्षात घेतल्यास आतापर्यंत भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून गेलेली लोकसंख्या लाखाच्या घरात पोचेल.

या सर्वच प्रकारच्या स्थलांतरणांचा आपण सारासार विचार करणार की आपली गरज असलेल्या बिगरगोमंतकीय कामगार वर्गाच्या नावानेच केवळ शंख करीत बसणार?

(तत्पूर्वी दैनिक हेराल्ड मध्ये प्रसिद्ध)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs