घटक राज्य, की घटकांचे राज्य?

By Sandesh Prabhudesai
30 May 2012 14:11 IST

गोव्याची आजची परिस्थिती काय आहे आणि समस्या काय आहेत असे विचारले की आपली काही ठरलेली उत्तरे आहेत. उदाहरणार्थ भ्रष्टाचार, बेकारी, मायनिंग, पर्यावरणाचा ह्रास, साधनसुविधांचा अभाव, बिगरगोमंतकियांचा सुळसुळाट, जातीयवाद, रेव्ह संस्कृती, ड्रग्स, कसिनो वगैरे वगैरे. पण खरोखरच ही आपली दुखणी आहेत? की ही मूळ आजाराची केवळ लक्षणे आहेत? गोवा मुक्त झाल्यास 50 वर्षे उलटलीत तर आपणास घटक राज्याचा दर्जा मिळाल्यास 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्याने मूळ आजाराचा वेध घेण्याचा हा थोडाफार प्रयत्न.

माझ्या दृष्टीने स्थलांतरण हा गोव्यात ऐतिहासिक पातळीवर घडत आलेला, मुक्तीनंतरही घडत राहिलेला आणि आजमितीलाही घडत असलेला एक प्रमुख प्रश्र्न आहे. हे स्थलांतरण, अर्थातच लोकसंख्येचे, तीन पातळीवर घडत आहे.

1. गोव्यांतर्गत गावातून शहरात झालेले स्थलांतरण

2. बिगर-गोमंतकियांचे गोव्यात झालेले स्थलांतरण

3. गोमंतकियांचे बाहेरगावी आणि परदेशी झालेले स्थलांतरण

शहरीकरणाचे भूत 

1960 च्या जनगणनेनुसार 5.33 लाख लोक ग्रामीण भागात रहात होते तर केवळ 94,000 शहरातून. म्हणजे 85 टक्के गावात तर केवळ 15 टक्के शहरात. हळूहळू शहरीकरण वाढत गेले आणि 2001 च्या जनगणनेत 50:50 अशी परिस्थिती आढळली. 6.70 लाख शहरात तर तेवढेच गावात. 2011 च्या जनगणनेत हे प्रमाण उलटे झालेले आढळते. 9 लाख शहरात तर केवळ साडेपाच लाख लोक गावात. म्हणजे 62 टक्के शहरात तर केवळ 38 टक्के गावात. म्हणजेच 360 गावे हळूहळू ओस पडत आहेत आणि 10-12 च असलेल्या शहरातून गर्दी वाढत आहे.

गोवा फारच छोटा आहे. शहरातून कोणत्याही दूर असलेल्या गावात जाण्याससुद्धा जास्तीत जास्त दोन ते तीन तासांचा प्रवास पुरे असतो. पण तरीसुद्धा आपण गावात शांत जाऊन रहाणे पसंत करीत नाही. उलट गावात काम करणारेसुद्धा संपूर्ण कुटुंबाला घेऊन शहरात येऊन रहातात व काम करणारा तेवढा गावात जाऊन येतो असे चित्र सध्या दिसत आहे. कारणे विविध आहेत. गावात राहून गुजराण करण्याइतका गावांचा विकासही झालेला ऩाही. शेती करून जगणारे अवघेच राहिलेत. त्याशिवाय यामुळे शहरातील जमिनीवर प्रचंड दबाव आलेला आहे. साधा सिंगल बेडरूम फ्लॅट विकत घेणेसुद्धा जड होऊ लागले आहे. तरीही गावातील प्रशस्त घर बंद ठेऊन शहरात महागड्या छोट्याशा जागेत रहाण्यासाठी आपली धडपड चालूच आहे.

मुलांचे शिक्षण गावापेक्षा शहरात जास्त चांगले मिळते ही आपली ठाम धारणा आहे. गावातील शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाचीसुद्धा. शहरात मनोरंजनाच्या व बिगर-शालेय इतर शिक्षणाच्या सोयीसुविधा जास्त चांगल्या आहेत वगैरे वगैरे. शहरातील शाळांपेक्षा ग्रामीण शाळांचा शैक्षणिक दर्जा कितीतरी चांगला असतो हे सत्यसुद्धा आपण नाकारीत आहोत आणि जीपमध्ये भरभरून आपल्या मुलांना शहरातील शाळांतून पाठवीत आहोत.

शहरातील कित्येक सुविधा ग्रामीण पातळीवर मिळवून दिल्यास शहरीकरणाचा अर्धा लोंढा कमी होऊ शकतो. परंतु या सत्य परिस्थितीवर कुठे चर्चाही झालेली दिसत नाही, मग त्यासाठी सरकारी पातळीवर योजना तयार करण्याचे तर दूरच राहिले.

बिगर-गोमंतकीयांना विनाकारण शिव्या-शाप

गोव्याची आजची लोकसंख्या आहे साडेचौदा लाख. त्यातील किमान पाच लाख तरी भारताच्या विविध भागातून गोव्यात येऊन स्थायिक झालेले आहेत. त्यात इथे जमिनी, बंगले वा फ्लॅट घेऊन राहिलेले लोक आहेतच, परंतु जास्त प्रमाणात आहेत ते स्थलांतरीत कष्टकरी मजूर-कामगार. पूर्वी ते शहरातूनच दिसायचे. पण आजकाल गोव्याच्या कानाकोपऱ्यात कुठल्याही गावात गेल्याससुद्धा ते आढळतात. या घांटी लोकांनी गोव्याचा सत्यानाश केलेला आहे असा आपला एक ठाम मध्यमवर्गीय गैरसमज आहे. प्रत्यक्षात इथे गरज आहे म्हणून हे लोक इतर राज्यांतून आपल्या गोव्यात पोचलेत. आपल्या जगण्यासाठी लागणारी मूलभूत कामे करणारा मजूर वा कामगार गोमंतकियांमध्ये उपलब्ध नाही म्हणून त्यांनी त्यांची जागा घेतलेली आहे. त्यांना इथून हाकलायला पाहिजे हा आपला नेहमीचा डायलॉग. हाकलून बघा आणि नंतर गोवा चालवून दाखवा. रस्ते, गटारे वा कचरा साफ करणे धरून बांधकामे करणे वा सुतारकाम, गवंडीकाम, केशकर्तनालये असे सगळेच व्यवहार ठप्प होतील. पण या गोष्टी ठाऊक असूनसुद्धा आपण सोयिस्करपणे नाकारतोय.

गोव्यात सर्वात मोठा बिगर-गोमंतकियांचा लोंढा आला तो मुक्तीनंतरच्या पहिल्या दहा वर्षांत. जवळजवळ लाखभर तरी बिगर-गोमंतकीय गोव्यात आले. त्यातील बहुतेक इथेच स्थायिक झाले. त्यांची तिसरी पिढी आज गोव्यात वावरत आहे. किमान 40-45 वर्षांपूर्वी आलेले हे बिगर-गोमंतकीय आज पूर्णपणे नीज गोंयकार झालेले आहेत. परंतु त्यांना गोंयकार म्हणण्याची अजून आपली मानसिक तयारी नाही. त्यांनाही मानापमान असतो हे आपण सोयिस्करपणे विसरतो. त्यानंतरही गेली कित्येक वर्षे सातत्याने हे स्थलांतर चालूच होते. आमच्या गरजा भागविण्यासाठी. पण गेल्या पाच वर्षांत मात्र हे स्थलांतरण झपाट्याने रोडावत चाललेले आहे. राष्ट्रीय ग्रामीण स्वयंरोजगार योजना आल्यापासून त्या लोकांना आपापल्या गावात मानाने काम करून जगणे शक्य झालेले आहे. साहजिकच त्याचा परिणाम म्हणून त्यांनी गोव्याकडे पाठ फिरविणे सुरू केले आहे. त्यामुळे आज कित्येक आवश्यक कामांसाठी मजूर मिळणे मुष्किल झालेले आहे.

या स्थलांतरीत मजूर वर्गाचे राहणीमान बघितले तर स्वतःला सुसंस्कृत गोव्याचे रहिवाशी म्हणणाऱ्या आमची मान शरमेने खाली जावी. सामान्य गोमंतकियाच्यासुद्धा राहणीमानापेक्षा एकदम उलटे. एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत दहा-बारा लोक रहातात. 10-12 वर्षाची आपली मुले शाळेत जातात तेव्हा त्यांची मुले कष्टाच्या कामांना सुरवात करतात. साधारण 40-45 हे आपले आपापल्या नोकरी-व्यवसायात काहीतरी कामगिरी करून दाखविण्याचे वय. या वयात हा स्थलांतरी मजूर पूर्णपणे थकलेला असतो. 60 वर्षांनंतर तो जगला तरच नवल. आपण गोमंतकीय मात्र आजकाल पंच्याहत्तरी सहज पार करतो. हा विरोधाभास एवढ्याचसाठी की आज या मजूरांची आपणास गरज असली तरी त्याच्या सुखयोयींकडे आपण आणि आपले प्रशासन अजिबात लक्ष देत नाही. हे असेच चालू राहिले तर उद्या गोव्याला अत्यावश्यक असलेला मजूरवर्ग आपणास मिळणार नाही. आपण त्यांना हाकलून लावण्याची अजिबात गरज नाही. तेच दुसरा चांगला पर्याय मिळाल्यावर इथून निघून जातील. मग घांटी म्हणून हिणविण्याचे विकृत सुख आम्हाला देण्यासाठीसुद्धा इथे कुणी रहाणार नाही. तेव्हा आज गरज आहे ती पूर्णपणे गोमंतकीय झालेल्या दोन पिढ्यांपूर्वीच्या बिगर-गोमंतकीयांना गोव्याच्या संस्कृतीत सामावून घेण्याची आणि काल-परवाच आलेल्या बिगर-गोमंतकीय मजूरवर्गाला मानवी दृष्टिकोणातून सर्व प्रकारच्या मूलभूत सोयी-सुविधा देण्याची. अन्यथा, गोव्याची धडगत नाही.

परदेशस्थ बिगर-गोमंतकीय

गोव्यात राहून गोव्यासाठी काम करणारा तो गोमंतकीय, की गोव्यात जन्माला आल्यावरसुद्धा परदेशात जाऊन स्थायिक होण्याची स्वप्ने पहाणारा तो गोमंतकीय? हा वर्ग गोव्यात आजकाल झपाट्याने वाढत आहे. पोर्तुगीज पासपोर्ट करून युरोपमध्ये घुसण्यासाठी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करण्याचीसुद्धा त्याची एका पायावर तयारी आहे. बाहेरगावी नोकरी-व्यवसायासाठी जाऊन परत गोव्यात येणारे वेगळे आणि परदेशी बनून भारतियत्वाचा त्याग करणारे प्राउड गोवन्स वेगळे. ते मग तिथे राहून फेसबूकवरून वा वेळप्रसंगी स्वताची वेबसाईटसुद्धा काढून गोमंतकियांना शिव्या देत बसणार. गोव्याच्या विकासासाठी काहीच करणार नाहीत. फक्त सल्ले देत टाइम पास करणार.

मात्र त्याचबरोबर गोव्यात रहाण्याची इच्छा असूनसुद्धा संधी नाहीत म्हणून बाहेर जाणारा गोमंतकीय तरूण वर्गही दिवसेंदिवस वाढत आहे. गोव्यातील नोकरी-व्यवसायाच्या संधी आणि आपले शिक्षण यांचा ताळमेळ बसवणे आजपर्यंत कोणत्याही सरकारला जमलेले नाही. खुद्द गोव्याची 58 टक्के अर्थव्यवस्था सेवा उद्योगावर आधारित आहे. परंतु त्यासाठी गोमंतकीय तरुण वर्गाला तयार करणे आजपर्यंत आपणास जमलेले नाही. अर्थातच त्यामुळे इतर राज्यातून येऊन इथे सेवा उद्योगात जम बसवणारे आपणास आज पावलोपावली आढळतात. आपला सर्वसामान्य युवक अजून सरकारी नोकऱ्यांच्याच मागे धावत आहे. जो हुषार आहे तो बाहेरगावी जात आहे. यातून गोव्यात इंटॅलॅक्चुअल व्हॅक्यूम तयार होण्यास वेळ लागणार नाही. तेलही गेले, तूपही गेले, हाती आले धुपाटणे असे म्हणावे लागणारा दिवस जास्त दूर नाही.

तरीसुद्धा प्रतिमाणशी उत्पन्नात गोव्याचा क्रमांक राष्ट्रीय पातळीवर पहिला लागतो. कारण परदेशात काम करणारे गोमंतकीय इथे भरघोस ठेवी निर्माण करतात. त्यांच्या हातात पैसा खेळतो. शिवाय दर 26 वा गोमंतकीय इथे सरकारी नोकर आहे. खास करून सहाव्या वेतन आयोगानंतर त्याच्या उत्पन्नात भरघोस वाढ झालेली आहे. आणखीन अशाच कित्येक निकषांत गोवा पहिल्या तीन क्रमांकांमध्ये येतो. गोव्याचे मुख्यमंत्री मग तिथे जाऊन पारितोषिकेही घेऊन येतात. आपला गोवा सर्वोत्कृष्ट याच भ्रमात वावरतात. आजचे मायनिंग उद्या संपणार आणि एखाद्या छोट्याशा वाईट गोष्टीनेसुद्धा पर्यटक गोव्याकडे पाठ फिरविणार हे ठाऊक असूनसुद्धा. सर्वकालीन टिकावू अशी अर्थव्यवस्था अजून गोव्यात तयार झालेली नाही याची जाणीव असूनसुद्धा.

अर्थकारणाच्या अंतरंगातील विरोधाभास

गोव्याच्या अर्थकारणाचे आकडेही मोठे मजेशीर आहेत. गोमंतकियांच्या प्रतिमाणशी बँकांतील ठेवी आहेत 1.72 लाख रुपये, तर प्रतिमाणशी कर्ज दिले जाते केवळ 44,000 रुपये. भारतातील कुठल्याही राज्याच्या उलट ही परिस्थिती आहे. दिल्ली राज्यात प्रतिमाणशी ठेवी आहेत 3.16 लाख रुपये तर प्रतिमाणशी कर्ज 2.38 लाख रुपये. चंदिगडमध्ये हेच प्रमाण ठेवींचे आहे 2.32 लाख रुपये तर कर्जाचे 3.06 लाख रुपये. याचाच अर्थ आपणाकडे पैशांची ठेव आहे, परंतु त्याचा उत्पादकतेच्या दृष्टीने उपयोग अगदीच मामुली स्वरुपाचा आहे. इथे बँकांचा सुकाळ आहे तो उत्पादकतेसाठी कर्ज देण्यासाठी नव्हे तर केवळ ठेवींचा पैसा जमा करण्यासाठी. या पैशांचा फायदा भारतभर इतरत्र केला जातो, परंतु गोव्यात नव्हे. आपलेच उत्पन्न आपण अश्या तह्रेने फुकट घालवीत आहोत. छानछौकी व मजेसाठीच हा पैसा जास्त वापरीत आहोत.

आपले राहणीमान बघितले तर ते भारतात सर्वोत्कृष्ट. 2011 च्यान जनगणनेतील ही आकडेवारी डोके चक्रावून टाकते. भारतात केवळ 47 टक्के लोकांकडे टीव्ही तर आपणाकडे 81 टक्के लोकांकडे. संगणक भारतात सरासरी केवळ 9 टक्के लोकांकडे तर गोव्यात 31 टक्के लोकांकडे. फोन तर 90 टक्के लोकांकडे. दुचाकी भारतात सरासरी 21 टक्के लोकांकडे तर गोव्यात 57 टक्के लोकांकडे. गाड्या भारतात सरासरी फक्त 5 टक्के लोकांकडे तर गोव्यात 25 टक्के लोकांकडे. 65 टक्के दुचाक्या 40 हजारांहून जास्त किंमतीच्या तर 80 टक्के गाड्या तीन लाख रुपयांहून जास्त किंमतीच्या. सायकली भारतात सरासरी 45 टक्के लोकांकडे तर आपणाकडे केवळ 25 टक्के लोकांकडे.

गोव्याला सुशिक्षित मानतात. आपले साक्षरतेचे प्रमाण तर 87 टक्के! अशा या सुखसंपन्न गोव्यात प्रत्यक्ष शिक्षणाची परिस्थिती काय? एक लाख विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत असतील तर त्यातील केवळ 58 हजार दहावीपर्यंत मजल मारतात. 43 हजार, म्हणजेच जवळजवळ 43 टक्के विद्यार्थी, वाटेवरच गळतात. त्यांच्यासाठी पर्यायी शिक्षणाच्या सुविधा फारच अत्यल्प. 2011 च्या जनगणनेनुसार गोव्यातील 46 टक्के, म्हणजे जवळजवळ अर्धी घरे,  केवळ एक वा दोन खोल्यांची आहेत. यात बिगर-गोमंतकीय मजूर जसे आहेत तसेच गोमंतकीयसुद्धा मोठ्या संख्येने आहेत. अशी विरोधाभास दाखविणारी एक दोन नव्हे, कित्येक उदाहरणे देता येतील.

थोडक्यात सांगायचे झाल्यास गोवा दिसतो तसा नाही. त्याच्या अंतरंगात भलतेच विदारक सत्य लपलेले आहे. या सत्याचा वेध घेण्याचा प्रयत्न होणे जरुरीचे आहे. केवळ राजकीय परिवर्तन झाले म्हणून या प्रश्र्नांवर उपाय निघू शकणार नाहीत. त्यासाठी गोव्यातील सर्व विद्वान, शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ अश्या सर्वच बुद्धिजिवी मंडळींनी डोकेफोड करणे आवश्यक आहे. बाहेरून दिसतो तसा गोवा एकसंघही नाही. तो दिवसेंदिवस जास्तच विभागत चालला आहे. पूर्वी जाती व धर्मांतच विभागणी होती. आता भाषेबरोबरच लिपी, धर्मांबरोबरच अल्पसंख्यांकविरोधी, ख्रिश्र्चनांना अराष्ट्रीय म्हणणारे आणि मुसलमानांना अतिरेकी म्हणवणारे फुटीर वाढत चालले आहेत. भलेभले विद्वानसुद्धा या अपप्रचारात अग्रणी दिसत आहेत.

दुसऱ्या बाजूने विकृत पर्यटनाला प्रतिष्ठा प्राप्त झाल्याने विकृत संस्कृतीलाही प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. आत्मकेंद्रित बनत चाललेली पिढी मोठ्या जोमाने पुढे येत आहे. सकारात्मक दृष्टी ठेऊन विधायक कार्य करण्यापेक्षा नकारात्मक सूर लावून विघातक कार्य करणे म्हणजे समाजकार्य अशी एक अफलातून व्याख्या तळागाळामध्ये मूळ धरू लागली आहे. माझा धर्म फक्त अपोझ करणे, प्रपोझ करणे नव्हे असे मोठ्या अभिमानाने सांगणारे समाज कार्यकर्ते जनतेचे पुढारी बनले आहेत.

कुणाजवळही सर्व प्रकारच्या गोमंतकियांना एकत्र बांधण्याचा कार्यक्रम दिसत नाही. दिसतात ते फक्त विभाजनाचे कार्यक्रम. त्यामुळेच कुठलाही प्रश्र्न निर्माण झाला की तो आपसूकच विभाजनाची वाट धऱतो. लोकही आपापल्या गटाच्या शक्तिप्रदर्शनासाठी अहोरात्र खपताना दिसतात. सर्वांना एकत्र आणण्यासाठी वावरणारा कुणी दिसतच नाही. एकसंघपणा आणि समरसतेची भावनाच कुठे दिसत नाही.

म्हणूनच मग मनाला प्रश्र्न पडतो – हे घटक राज्य, की वेगवेगळ्या घटकांचे राज्य?

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

Agadi mazya manatale vichar mandlet. lokmatmadhe ha lekh vachala. Govyache prachand nuksan gelya kahi varshanpasun suru aahe. keval bhashavad, dharma kinva jativadat adkun rahnyache divas sampale aahet, he lakshat thevun vatchal keli tarach goa vachel...

- pramod koyande, goa | 31 st May 2012 17:51

 

Good Article

Food for thought

Ajinkya

- Ajinkya Kulkarni, Pune | 30 th May 2012 14:44

 

Related Blogs