मार्ग संस्कृती रुजवुया

By Sandesh Prabhudesai
27 December 2015 16:10 IST

गोव्याचा ‘भारतीय’ पॉप सिंगर रेमो फॅर्नांडीसचा मुलगा जोना गाडी चालवत असताना झालेल्या अपघातात रस्त्यावरून चालणारी मालवणची मुलगी एलन डिसोझा गंभीर जखमी झाली आणि रस्त्यावरचे अपघात परत एकदा ठळकपणए बातमीत आले. या प्रकरणाला आता कित्येक फाटे एक तर फुटलेले आहेत वा फोडण्यात आलेले आहेत. रेमोने अपघातग्रस्त गरीब कुटुंबाला देऊ केलेले 50 हजार रुपये, रेमोने त्या अल्पवयीन मुलीला अपशब्द वापरल्याचा आरोप, त्यातून समोर आलेले रेमोचे पोर्तुगीज राष्ट्रीयत्व, रेमोने केलेले त्याचे समर्थन, आपण परदेशस्थ भारतीय नागरिक असल्याचा दिलेला पुरावा वगैरे वगैरे. पोर्तुगीज नागरिक असताना त्याला पद्मश्री मिळालीच कशी यावर वाद निर्माण करताना किती तरी परदेशस्थ भारतीय नागरिकांना आजपर्यंत पद्म पुरस्कार दिल्याच्या व बिल व मेलिंदा गेट्स सारख्या अमेरिकनांसहित फ्रांस, जर्मनी, चीन, जपान व पोर्तुगीज मिळून एकूण 17 परदेशी नागरिकांना (मूळ भारतीय नव्हे) याच वर्षी पद्म पुरस्कार दिल्याच्या बातम्याही आपण सहजगत्या विसरलो आहोत. इंटरनेसारख्या सोयीसुविधांमुळे संपूर्ण जगाची माहिती आपल्या मोबाइलवरसुद्धा उपलब्ध असतानाही आपणच आपली दिशाभूल का म्हणून करून घेतोय हे एक न उलगडणारेच कोडे आहे.

अपघात हा अपघात असतो. तो मुद्दामहून नियोजनबद्धरित्या केला जाणारा खून नसतो वा मारहाणीसारखा गुन्हाही नसतो. काही वेळा मानवी चुकांमुळे अपघात होतात तर काहीवेळा अक्षम्य निष्काळजीपणामुळे, दारू वा ड्रग्सच्या नशेत असल्यामुळे वा केवळ मदांध वृत्तीमुळेही अपघात होतात. आपण सर्वचजण यातून गेलेलो आहोत. तरीही सेलेब्रिटीस वा त्यांच्या मुलांनी अपघात केले की ते मदांध होऊनच केलेले असावेत असे गृहित धरूनच आपण त्यांच्यावर तुटून पडतो. आपल्याच नकळत कधी कधी आपल्या मनात खदखदणारी वैफल्ये मग फेसबूकसारख्या सोशल मिडियावर अनिर्बंध वाहू लागतात. आपणाला त्यात एक अतीव समाधान मिळते. इथे नक्की काय झाले हे आपणाला कुणालाच अजून ठाऊक नाही. पण एक गोष्ट नक्की ठाऊक आहे. अपघात झालेला आहे आणि त्यात मालवणहून पायी चालत आलेल्या एका गरीब कुटुंबातील लहान मुलगी सध्या हॉस्पिटलमध्ये दोन ऑपरेशन झाल्यानंतर उपचार घेत आहे. त्यांनी रेमोने देऊ केलेले 50 हजार रुपये नाकारले आहेत. यातील सत्यासत्यता पोलीस शोधून काढेपर्यंत आपणाला थांबावेच लागेल, अन्य़था या प्रकरणाच्या मागे लागून आपणालाच कुणाला तरी हे सत्य शोधून काढावे लागेल.

मात्र या गडबडीत एका गोष्टीकडे आपण सर्वांनीच लक्ष दिले तर ते कदाचित सर्वांच्याच भल्याचे ठरेल. गोव्यात वाढत चाललेले रस्त्यांवरचे अपघात. रस्ते अरुंद आहेत म्हणून अपघातांचे प्रमाण वाढत आहे की रस्ते रुंद होत चालले आहेत म्हणून ते वाढत चालले आहेत? कदाचित दोन्हींमुळे असेल. मात्र वाहने भरधाव चालवण्याची एक नवीन संस्कृती गोव्यात वाहनांच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने वाढत चाललेली आहे हे मात्र नक्की. अर्थात, यात तरुणाई जास्त प्रमाणात असणे वयोमानानुसार साहजिकच आहे. त्याचबरोबर रस्ता रुंदीकरणाच्या प्रमाणाबाहेर कितीतरी पटींनी जास्त प्रमाणात दुचाकींची संख्या गोव्यात वाढते आहे. त्यात भर म्हणून गोव्यात येणारा पर्यटकांचा लोंढा. गोवा हा सध्या भारतातील तरुणाईचा परवलीचा शब्द बनला आहे. तोही पूर्वीसारखा केवळ नोव्हेंबर ते जानेवारीतच नव्हे, तर वर्षाचे 365 दिवस. तेही केवळ दिवसा नव्हे, तर रात्री बेरात्री केव्हाही. रात्र जेवढी वाढत जाते तेवढा रस्त्यावर वाहन घेऊन जाण्याचा धोका वाढत जातो. गोव्यात गेली कित्येक वर्षे वाहनांचे होणारे अपघात पाहिले तर त्यात जाणारी बळींची संख्या कमी होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

म्हणजे सरासरी प्रत्येक वर्षी 300 माणसे रस्त्यावरच्या अपघातात बळी पडतात. यात दोन वाहनांमध्ये टक्कर होऊन जाणारे बळी तर असतातच, पण त्याहूनही दुर्देवी म्हणजे एक तृतियांश मृत्यू हे वाटसरू वा सायकलस्वारांचे असतात. म्हणजे सरासरी 100. आणि त्यात डिसेंबर व जानेवारी महिन्यांत ही अपघातांची संख्या व मृत्यूंचीही संख्या वाढतच जाते. सगळीच आकडेवारी काही देणे शक्य नाही. परंतु गेल्या वर्षीचीच आकडेवारी घेउया. एकूण 4230 रस्त्यांवरचे अपघात. म्हणजे मासिक 353 वा दिवसागणिक 12 अपघात. त्यातील सर्वाधिक डिसेंबरमध्ये 422 तर जानेवारीत 433. दर महिन्याला सरासरी 25 मृत्यू केवळ रस्त्यावरच्या अपघातांमुळे. यातील केवळ 10 अपघात ड्रग्स वा दारूच्या नशेत झालेल्या अपघातांचे. बहुतेक अपघात हे एक तर निष्काळजीपणे वाहने चालविल्याने, वेगाने वाहने चालविल्याने वा वेगात ओव्हरटेक करताना झालेले. हे अपघात जेवढे राष्ट्रीय हमरस्त्यांवर होतात तेवढेच गावा-गावातील रस्त्यांवरही होतात. आणि हे सर्व जाणून घेण्यासाठी अधिकृत आकडेवारीच पाहिजे असे नाही. तासभर रस्त्यावर उभे राहिल्यास आपणालाच त्याचा अंदाज येईल.

यासाठी आणखीन एक-दोन संस्कृती कारणीभूत आहेत. अल्पवयातच मुलांना दुचाकी शिकविण्यात धन्यता मानणारे सु-शिक्षित पालक व त्यांना सर्रास मोटारसायकल्स घेऊन देण्याचे फॅड. तरुणाईचा जोश, हॅल्मेट हातात लोंबकळवत बिनडोक्याने बायक चालविण्याची स्टायल व स्पीडिंग बायक्स तयार करण्याचा उद्योजकांना दिलेला मुक्त परवाना. वाहनांच्या या वाढत चाललेल्या संख्येपुढे रस्ते अपुरे पडत चालल्याने रस्ता रुंदीकरणाची मागणी सर्वत्र. पण रस्ते रुंद करण्यासाठी जमीनच नाही. मग रस्त्याच्या बाजूचे शोल्डर्स (रस्त्यावरचा डांबर व रस्त्याच्या बाजूचे गटार यामध्ये सोडलेली रिकामी जागा) व गटारेसुद्धा बुजवून रस्ते रुंद करण्याचा पराक्रम करणारे आमचे पंच-सरपंच-आमदार व त्यांना एका शब्दानेही हे चुकीचे आहे असे न सांगणारे सार्वजनिक बांधकाम खात्यातले अभियंते. यामुळे रस्त्यांवरून चालायचे कुठे आणि कसे? कुणाची बात करता राव? रस्त्यांवरून चालणारी लोकं आहेतच किती? इन मीन तीन. आणि कोणता प्रतिष्ठित गोंयकार सध्या सायकल चालवतो? त्यांच्यासाठी कशाला हवी रस्त्यांवर जागा? ठोकले एका-दोघांना तर त्यात एवढे काय बिघडते? आम्हाला रस्ता रुंद हवा ना. मग करा रुंद. कारण रस्ता रुंदीकरणात मतेही आहेत आणि कमिशनही आहे. वाटसरूंकडे वा सायकलस्वारांकडे देण्यासारखे आहेच काय मुळी?


या सर्व समस्यांकडे लक्ष ओढून सुशिक्षित प्रतिष्ठित गोंयकारांमध्ये ट्रॅफिक सेन्स आणण्यासाठी वृद्धत्वाकडे झुकलेल्या स्वातंत्र्यसैनिक गुरुनाथ केळेकर यांनी ‘मार्ग’ नावाची एक चळवळच गोव्यात सुरू केली. परंतु त्यांची ही लोकाभिमुख व मानवी जीवन वाचविण्याची चळवळ कोणत्याच राजकारण्याला वा सत्ताधारी पक्षाला रुचली नाही. त्यामुळे कुणी तरी सुरू केलेले त्यांचे सरकारी अनुदानसुद्धा काहीबाही कारणे सांगून त्यांच्यानंतर आलेल्या मंत्र्यांनी सरळ बंदच करून टाकले. ‘मार्ग’ची संकल्पना बेळगावच्या लोकांनीसुद्धा उचलून धरली. मात्र आमच्या राजकारण्यांनी ती गाडून टाकून त्याच्यावरून डांबरसुद्धा फिरवला. काय कोणता म्हातारा कमाईत अडथळा आणतोय. करा बदनाम त्याची चळवळ आणि काढा काटा या चळवळीचा आमच्या धंद्याच्या मार्गातून. राजकीय अर्थकारणात एका नागरी संस्कृतीच्या चळवळीचा असा बळी गेला तेव्हा कुणी सामाजिक कार्यकर्ताही पुढे आला नाही वा कुणी वकीलानेही त्यांचे वकीलपत्र घेतले नाही. कारण लोकाभिमुख चळवळीच्या मार्गात अडथळा आणणे हा आमच्या लोकशाहीत मुळात गुन्हाच नाही व चळवळीच्या संरक्षणासाठी कोणता कायदाही आमच्याकडे अस्तित्वात नाही.

मात्र एक गोष्ट आपण खचितच करू शकतो. एकदम साधी आणि सोपी. खास करून रस्त्यांवरून चालताना. रस्त्याने चालताना डाव्या बाजूने चालण्याची परंपराच होऊन बसलेली आहे. आणि ही अत्यंत चुकीची परंपरा आहे. कारण त्यामुळे आपल्या मागून कसले वाहन किती वेगाने येतेय हे आपणाला दिसतही नाही आणि त्याने येऊन ठोकर देईपर्यंत आपणाला काही कळतही नाही. तेव्हा चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्याची संस्कृती समाजात रुजवुया. आपणही उजव्या बाजूने चालूया आणि दुसऱ्यांनाही मुद्दाम थांबून सांगूया. रस्त्यावरचे अपघात टाळण्यासाठी कोणी काय केले नाही ते सांगीत दोष देणे फार सोपे आहे. पण त्याहूनही सोपे आहे आपणच आपला जीव वाचविण्यासाठी उचललेले एक छोटेसेच, परंतु महत्वाचे पाऊल. रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्याचे. त्यामुळे पुढून काय संकट येतेय याची कल्पना तरी आपणास येईल. जास्त काही होणार नाही. वाचलाच तर आपला स्वतःचाच जीव वाचेल, एवढेच. ओके, जगलो-वाचलोच तर भेटुया पुढच्या वर्षी. तुम्हा सर्वांना नाताळाच्या भरभरून शुभेच्छा!

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs