असहिष्णुता

By Sandesh Prabhudesai
29 November 2015 11:22 IST

स्वामिनाथन अंकलेश्र्वर अय्यर हे ‘इकॉनॉमिक टाइम्स’चे सल्लागार संपादक व एक निष्पक्षपणे लिहिणारे नामांकित स्तंभलेखक. कोंकणी भाशा मंडळाने आयोजित केलेल्या एम् एस् प्रभु व्याख्यानमालेत ‘नरसिंह राव ते नरेंद्र मोदी’ या विषयावर व्याख्यान देताना त्यांनी सध्या देशात सर्वत्र चर्चेत असलेल्या असहिष्णुतेच्या प्रश्र्नावर भाष्य केले. या विषयावर भारतभर दोन्ही बाजूंनी चर्चा होत आहे. परंतु त्यांचे मत जरा वेगळेच होते. आपण असहिष्णुतेच्या प्रश्र्नावर असहिष्णुता दाखवत आहोत असे त्यांचे मत. आणि त्यांनी त्याचे स्वागतही केले.  म्हणजे समाजात असहिष्णुता वाढते आहे यावर त्यांचे दुमत नव्हते. परंतु जाती वा धर्माच्या नावे हत्या होणे ही काही नवीन गोष्ट नाही, त्या गेली कित्येक दशके होतच आहेत हे त्यांचे ठाम मत तसे खरेही आहे. परंतु मोदी सरकारच्याच काळात या घटनांवर विचारवंत समाज पद्धतशीररित्या तुटून पडतोय असा आक्रोश चाललेला आहे. यावर मात्र त्यांचे मत जरा वेगळेच होते.

1990 च्या दशकात आपण याहूनही भयानक घटना अनुभवल्या आहेत असे सांगताना बाबरी मशीद पाडण्याची घटना व त्यानंतर भारतभर उसळलेली जातीय तेढीची प्रखर भावना, राजीव गांधी हत्याकांडानंतरची दंगल, मुंबईतील बाँब स्फोटांनंतरची दंगल अशी कित्येक उदाहरणे त्यांनी दिली. परंतु त्या काळात टीव्हीसारखी प्रभावी प्रसार माध्यमे केवळ सरकाराच्या हातात होती. हळूहळू खाजगी कंपन्यांचे टीव्ही चॅनल यायला लागले. गुजरातसारख्या दंगलींतली अमानवी हत्याकांडे दृकश्राव्य माध्यमांतून लोकांपर्यंत जायला लागली आणि आता तर नुसते गोमांस साठवलेले आहे या संशयाखाली एखाद्याला जिवंत मारण्याची घटनासुद्धा राष्ट्रीय स्तरावरील बातमी व्हायला लागली. अर्थातच समाज त्यावर प्रतिक्रियाही द्यायला लागला. प्रत्यक्षात, त्यांच्या मते, आताच्या घटनांपेक्षा पूर्वीच्या घटना जास्त भयावह होत्या. परंतु त्यावेळी टीव्हीसारखी प्रभावी प्रसार माध्यमे नव्हती आणि समाजही आजच्यासारखी प्रतिक्रिया देत नव्हता. आज समाजातल्या नागरी कर्तव्याचा दर्जा जास्तच वाढायला लागलेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून लेखक व शास्त्रज्ञसुद्धा या घटनांचा निषेध करीत आपापले पुरस्कार परत करायला लागले आहेत. या जबाबदार सामाजिक जाणिवांचे आपण स्वागत करायला हवे.

अय्यर यांनी चूक असे काहीच सांगितलेले नाहीय. परंतु खाजगी प्रसार माध्यमे आणि समाजात वाढत चाललेली सामाजिक जबाबदारीची भावना एवढ्यापुरताच हा प्रश्र्न आहे का? कारण वाढत चाललेल्या असहिष्णुतेवरच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य समाजातून येत नाही आहेत. समाजातील एक घटक – जो विचारवंत आहे, परंतु तेवढाच संवेदनशीलही आहे – त्या घटकाकडून या प्रतिक्रिया जास्त प्रखरपणे येत आहेत. खास करून लेखक, कलाकार, शास्त्रज्ञ वगैरे. त्यांच्यावर तुटून पडणाराही तेवढाच मोठा घटक याच सुशिक्षित समाजात आहे. वॉट्स एप वा फेसबूकवर फिरणारे पोस्ट बघितले तर अय्यर सांगतात तसा समाजातील संवेदनशीलतेचा दर्जा वाढायला लागलाय की तो खालावत चाललाय असा प्रश्र्न पडतो. आमिर खान असुरक्षिततेच्या भावनेवर बोलतो आणि बायकोने त्यावर सुचविलेला देश सोडून जायचा सल्ला अनर्थकारी असल्याचेही आपणच सांगतो. तरीही ‘देश सोडून जाण्याची भाषा करणारा आमिर’ अशी त्याची संभावना करून हा भारताचा अभिमान नसणारा मुसलमान आहे आणि देशद्रोही आहे इथपर्यंत तुटून पडणारा वा मोठ्या अभिमानाने हे दिशाभूल करणारे पोष्ट फॉरवर्ड करणारा समाज हाही सुशिक्षितच आहे. यात कुठे आला उंचावलेला दर्जा? उलट खालावलेली सामाजिक पातळीच यातून जास्त दिसून आली.

लेखक, विचारवंत वा शास्त्रज्ञांनी परत केलेले पुरस्कार जसे काँग्रेसप्रणित नव्हते तसेच त्यांचा विरोध करणारे सोशल मिडियावरचे पोष्टही काही भाजपाप्रणित नव्हते. असते तर ते असे उत्स्फूर्तपणे व्हायरल झाले नसते. अय्यर सांगतात तसे केवळ एक टीव्हीचे माध्यम खाजगी हातात गेल्याने हे झालेले नाही. भारतात संपर्क माध्यमाचा आणि सामाजिक प्रसार माध्य़माचा (सोशल मिडियाचा) स्फोट झालेला आहे. कालपर्यंत कुजबुजणाऱ्यांना कंठ फुटलेला आहे. त्यांच्या स्वतःच्या हातात प्रसाराचे अस्त्र आलेले आहे. काहीजण त्याचा विधायक वापर करीत आहेत तर काहीजण विघातकरित्या. परंतु तटस्थपणे या दोन्ही प्रकारच्या प्रसारांकडे पाहिल्यास समाज कोणत्या दिशांनी चाललेला आहे याची प्रचिती येते. या अशा प्रत्येक प्रसंगागणिक एक भली मोठी रस्सीखेच समाजात चाललेली दिसते. आणि इथे अय्यर सांगतात ती गोष्ट जाणवतेय. पूर्वी पुरोगामी विचारांना समाजातून भरघोस पाठिंबा मिळत नसे. आज त्यांच्या मागे रहाणारा घटकही तेवढा प्रबळ बनत चाललेला आहे. त्यामुळे ही रस्सीखेच अटीतटीची व्हायला लागलेली आहे. ‘खींचो खींचो’ हे आवाज दोन्ही बाजूंनी  तेवढेच मोठे ऐकायला येत आहेत.  


म्हणूनच तर दोन वर्षांपूर्वी डॉ नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली तेव्हा त्याचा निषेध करणाऱ्या सभा या अचंबित करणाऱ्या होत्या. समाजाच्या सर्व थरांतून उत्स्फूर्तपणे लोक रस्त्यावर उतरले होते. पुण्यातला मोर्चा तर न भूतो न भविष्यति असा होता. कॉ गोविंद पानसरेंची हत्या झाली तेव्हाही खास करून कोल्हापूरात व संपूर्ण महाराष्ट्रात निषेधाच्या लाटा नुसत्या उसळत होत्या. प्रा एम् एम् कलबुर्गींचीही अशीच दिवसाढवळ्या त्यांच्या घरात घुसून हत्या झाली आणि देशातला विचारवंत पुरता खडबडून जागा झाला. जीवनाच्या अंतिम टप्प्यात पोचलेल्या या वयोवृद्ध विचारवंतांची कसली भीती कोणाला वाटू लागली होती म्हणून त्यांनी त्यांची जीवनयात्राच संपवली? ही केवळ असहिष्णुता नाही. विचारवंतांच्या या हत्या असोत वा गोमांस साठवल्याच्या संशयावरून जमावाने सामुहिकरित्या केलेली हत्या असो, यातील सूत्र एकच दिसते. हे विचारवंत मांडीत असलेले विचार एका ठराविक सामाजिक घटकाच्या संस्कृतीवर घाला घालीत होते व याची या पुराणसंस्कृतीरक्षकांना भीती वाटत होती. प्रत्यक्षात या हत्या त्यांच्यावरच उलटल्या. दाभोळकरांचे अंधश्रद्धा निर्मूलन जनमानसात जास्त जोमाने पसरू लागले तर पानसरेंनी मांडलेला खरा शिवाजी महाराष्ट्राला तर कलबुर्गींचे सांस्कृतिक विचार ठावूक नसलेल्यांपर्यंत पोहोचले. अजून पसरतच आहेत.

एवढेच नव्हे. सध्या देश एका सांस्कृतिक संक्रमणातून जात आहे. अर्थव्यवस्था बदलली की सामाजिक संस्कृती बदलते. माणसाची मानसिकता बदलते. विचार करण्याची पद्धत बदलते. जीवनपद्धती बदलते. कालपर्यंत क्षीण असलेला पुरोगामी संस्कृतीचा आवाज भलामोठा होत जातो. कारण हळूहळू सगळाच समाज, खास करून युवावर्ग, तिला कवटाळीत जातो. घराघरातून त्याचे पडसाद उमटू लागतात. खाणे, पिणे, वेषभूषा, केशभूषा, मनोरंजनाची साधने, दिनक्रम अशा सगळ्याच स्तरांवर ती ठळकपणे दिसू लागते. कालपर्यंत सरंजामी (फ्यूडल) संस्कृतीला कवटाळीत आपण औद्योगिकरणाची वाटचाल करीत होतो. परंतु माहिती तंत्रज्ञानाच्या उद्योगाने एक नवीन औद्योगिक संस्कृती भारतात प्रस्थापित करायला सुरवात झाली. त्याचा परिणाम म्हणून जागतिक स्तरावरील पुरोगामी विचारांचे संस्कृतीचे वारे कुणीही थोपवू शकणार नाही अशा वेगाने भारतात शिरले. त्याचा सर्वप्रथम माथेफिरू पद्धतीने विरोध केला तो प्रमोद मुतालिकच्या राम सेनेने. पबमधून युवक-युवतींना बाहेर ओढून काढून मारहाण करून. तेव्हापासून वेगवेगळ्या स्तरांवर हे वारे बेभानपणे वहात चाललेले आहे. प्रत्येकाने आपापल्या घरात नजर टाकली तर आपणालाच त्याचा पावलोक्षणी प्रत्यय येईल.

देशात सुरू झालेले हे सांस्कृतिक युद्ध आहे. ही केवळ असहिष्णुता नाहीय. यातील अवघेच काही माथेफिरू संस्कृतीरक्षक असहिष्णू हिंसक पद्धतीने प्रकट होत असतील. परंतु त्यांना गुपचूप समर्थन देणारा समाजातला घटक त्याहून कितीतरी मोठा आहे. तो सुशिक्षितही आहे आणि परंपरावादीही आहे. त्यांच्या घरातील युवा पिढी जर या ऩव्या अर्थनीतीशी संबंधित नसतील तरच ती वडीलधाऱ्यांबरोबर असतील. अन्यथा ही नवी पिढी नवसंस्कृतीला कवटाळून बेधडकपणे पुढे जाईल. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गीसारख्या विचारवंतांचे विवेकावादी शास्त्रशुद्ध विचार कालपर्यंत परंपरावादी असलेल्या सरंजामी संस्कृतीला मानवत नव्हते. त्यामुळे समाजात ते नगण्य होते. परंतु आजच्या युवा पिढीला ही विवेकवादी विचारसरणी आकर्षित करीत आहे. त्यामुळे म्हातारे असूनसुद्धा तरुणांना भावणारे हे विचारदूत पुराणमतवादी संस्कृतीरक्षकांना आपले पहिले दुष्मन वाटत आहेत. हे युद्ध आता केवळ रस्त्यावर नव्हे तर घराघरात पोचलेले आहे. काही ठिकाणी सहिष्णू पद्धतीने तर काही ठिकाणी असहिष्णू पद्धतीनेसुद्धा त्याचे खटके उडत आहेत. बदलत्या अर्थव्यवस्थेत या सांस्कृतिक युद्धाला दुसरा पर्याय नाही. कारण त्यातूनच उद्याचा पुरोगामी विचारांचा भारत घराघरातून उभा रहाणार आहे. तो सहिष्णू पद्धतीने उभा रहावा एवढीच सदिच्छा.

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

अभ्यासू लेख.खरें तर मागील सामाजिक मिड़ीयावरील लेखाला पूरक असा हा लेख..संदेश

- Prakash Kamat, Panaji | 29 th November 2015 12:43

 

Related Blogs