चित्र(विचित्र)पट संस्कृती

By Sandesh Prabhudesai
22 November 2015 10:42 IST

चित्रपट संस्कृती म्हणजे काय? 2004 साली भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात आल्यापासून गेली 11 वर्षे या चर्चेला जोर आलेला आहे. इफ्फीत दाखवले जाणारे चित्रपट हे खरे संस्कृतीप्रधान चित्रपट. बॉक्स ऑफिसवरचे चित्रपट हे संस्कृतीहीन चित्रपट. इफ्फीचे प्रतिनिधी हे समाजाचे सांस्कृतिक प्रतिनिधी. मसाला सिनेमा पहायला जाणाऱ्यांना संस्कृती म्हणजे काय ते ठावूकच नसते. इफ्फीच्या चित्रपटातून समाजाचे सत्यनिष्ठ प्रतिबिंब उमटते. मसाला चित्रपटातून समाजाची दिशाभूल केली जाते. जर हे खरे असेल तर मग समाजाचे सत्यनिष्ठ प्रतिबिंब उमटवणारा चित्रपट बहुसंख्य समाज का बघत नाही? सर्वसामान्य समाज या समाजाभिमुख चित्रपटापासून दूरच का रहातो? आणि समाजाची दिशाभूल करणारा मसाला सिनेमा सर्वसामान्य समाज डोक्यावर घेऊन का नाचतो? बॉक्स ऑफिसवर चांगला चालला म्हणजे तो मसाला सिनेमा बनतो का?  आणि इफ्फीसारख्या केवळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून दाखवला जाणारा चित्रपटच तेवढा संस्कृतीप्रधान चित्रपट असतो का? तर मग समाजापासून दूर आहे ती आपली संस्कृती? समाज उचलून धरेल असा संस्कृतीप्रधान चित्रपट आपण बॉक्स ऑफिसवर हिट का करू शकत नाही?  आणि जर करू शकत नाही, तर मग खोट सिनेमात आहे की समाजात? की समाजाला भावणारा सत्यनिष्ठ सिनेमा तयार करू शकत नसणाऱ्या सिने सृष्टीत?

इफ्फी आल्यापासून एक नवीन संस्कृती गोव्यातील तथाकथित बुद्धीजीवी समाजामध्ये रुजू लागलेली आहे. त्यांचा एक टिपिकल डायलॉग असतो – ‘गोव्यात सिनेमा संस्कृती अजून रुजायची आहे. आपण काढतो ते कोंकणी वा मराठी सिनेमा काय सिनेमा असतात?’  दुसऱ्याचे ते चांगले आणि आपले ते सगळे रद्दड ही आत्ममानहानीकारक संस्कृती ही मुळात आपली गोव्याची संस्कृती झालेली आहे. आपणास बाहेरच्यांचे काहीही ग्रेट वाटते. आणि आपल्या लोकांनी काहीही चांगले केले तरी ते रद्दडच वाटते. आपल्या कलाकारांना काहीही येत नाही आणि बाहेरचे कलाकारच अस्सल असतात असाही समज असतो. असे म्हणून आपलेच ते चांगले व बाहेरच्यांचे रद्दड असते असेही नाही. पण आपण जर चांगला चित्रपट निर्माण करू शकत नाही तर तो का यावर विचार व्हायला हवा. कारण भारतात, आणि खास करून मुंबईत आज बॉलिवूड म्हणून जगन्मान्य झालेली चित्रपट सृष्टी निर्माण करण्यात गोमंतकीय कलाकारांचे योगदान फार मोठे आहे. त्यात गायक, संगीतकार, अभिनेते तर आहेतच, परंतु कॅमेरामन, संकलक वगैरे तांत्रिक ज्ञानातही गोमंतकीय कलाकार यापूर्वीही चमकलेले आहेत आणि आजही चमकत आहेत. हे आपण सर्व बाहेर जाऊन करू शकतो. तर मग गोव्यात का करू शकत नाही? गोव्यात चित्रपट संस्कृती नाही म्हणून, की ती संस्कृती फोफावेल असे कसलेही प्रयत्न केले जात नाहीत म्हणून?

मुळात चित्रपट हे एक तांत्रिक माध्यम आहे. हे माध्यम हाताळणाऱ्या कलाकाराला चित्रपटाची तांत्रिक बाजू समजणे आणि उमजणेही अत्यावश्यक आहे. चित्रपट म्हणजे नाटक नसते इथपासून चित्रपटात मुळात कॅमेरा बोलतो आणि जे कॅमेरा बोलू शकत नाही तेवढेच काय ते डायलॉगातून आले पाहिजे इथपर्यंत आणि अभिनय पद्धती, लायट्स, सावंड, एडिटिंग अशा सगळ्याच गोष्टींचे ज्ञान सगळ्याच चित्रपट कलाकारांना असणे आवश्यक असते. त्याचे शिक्षण घेणे महत्वाचे असते. मग ते फिल्म इन्स्टिट्यूटमधून घ्या वा प्रत्यक्ष अनुभवातून घ्या. आपले गोवा सरकार इफ्फी गोव्यात येण्यापूर्वीपासून राज्य चित्रपट महोत्सव करतेय (कधी कधी) आणि चित्रपट निर्मितीसाठीही लाखो रुपयांचे अनुदान देते. परंतु चित्रपट तंत्राचे प्रशिक्षण देण्यासाठी अक्षरशः काहीही करीत नाही. आता आडातच नाही तर ते पोहऱ्यात येणार कसे? लक्ष्मीकांत शेटगावकर, बार्डरॉय बार्रेटो वा आता मिरांशा नाईक अशा गोमंतकीय युवा कलाकारांनी आपापल्या लघुपट वा चित्रपटातून आंतरराष्ट्रीय पातळीवर बक्षिसे पटकावली ती चित्रपट तंत्राचे शिक्षण घेऊनच. नुसता हिरा असला म्हणून तो चमकत नसतो, त्याला पैलू पाडावेच लागतात. हा निसर्गाचा शास्त्रशुद्ध नियम आहे. यापूर्वीही आपले गोमंतकीय कलाकार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले ते चित्रपट तंत्राचे प्रशिक्षण घेऊनच. उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला करून नव्हे. परंतु आजच्या घडीला तरी गोव्यात पाया घालण्यापूर्वीच कळस डोक्यावर घेऊन मिरवण्याचे प्रकार चालू आहेत. यातून चित्रपट संस्कृती रुजणार तरी कशी?

 

आज गोवा जगभर पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असले तरी हा पर्यटन उद्योग उभारण्यासाठी एक एक शक्कल लढवलीय ती इथल्या लोकांनी, सरकारने नव्हे. सरकार फक्त त्यांच्या मागे मागे गेलेय आणि पर्यटन उद्योगाचा मलिदा खाण्याचे तेवढे काम या सरकारातील राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी केलेय. आता गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे प्रमुख केंद्र म्हणून उभे रहातेय. त्यासाठी ‘चित्रपट’ सोसायटी करण्याऐवजी आपले सरकार ‘मनोरंजन’ सोसायटी स्थापन करतेय यातच सर्व काही आले. तरीही पहिल्याच इफ्फीपासून गोमंतकीय कलाकारांनी स्वतः पुढाकार घेऊन ‘24x7’ नावाने लघुपट निर्मिती आणि त्यांची स्पर्धा सुरू केली होती. पुढे ‘छोटा सिनेमा’ या नावाने ती काही काळ चालली. परंतु ती स्पर्धाच मनोरंजनाच्या नावाने चित्रपट क्षेत्राचा उदोउदो करणाऱ्या सोसायटीने बंद केली. खरे म्हणजे या उपक्रमांमुळे गोव्यातील कलाकार चित्रपटाचे तंत्र समजून घ्यायला लागला होता. वास्तवपूर्ण विषयांना हात घालून चित्रपटांची पातळी उंचावत परिणामकारक लघुपट तयार करू लागला होता. हे चित्रपट लोकांपर्यंत पोचविण्यासाठी पावले उचलण्याऐवजी सरकारने या तरुण कलाकारांचीच पावले छाटून टाकली. सगळी मदत काढून घेऊन त्यांना लुळेपांगळे केले. या होतकरू युवा कलाकारांना प्रशिक्षित करण्याबाबत तर आजपर्यंत कसलेही भरीव प्रयत्न झालेले नाही; सोडून पोकळ घोषणा. मग गोव्यात चित्रपट संस्कृती कशी काय रुजेल?

गोवा हा छोटासा प्रदेश आहे. शेजारच्या महाराष्ट्रातील सर्वात लहान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याहूनही लहान. तेव्हा बॉलिवूड वा टॉलिवूड सोडूनच द्या, महाराष्ट्रातील मराठी चित्रपट उद्योगासारखा चित्रपट उद्योग सुरू करणेसुद्धा इथे कठीण आहे. अशा वेळी विकसित तंत्रज्ञानाने आपणास एक फार मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. डिजिटल सिनेमा. चित्रपटाचे तंत्र तेच, परंतु सॅल्युलॉयड चित्रपटांपेक्षा खर्च कित्येक पटींनी कमी. परवडणारा. तरीही परिणाम तेवढाच. शिवाय हे डिजिटल सिनेमा बघण्यासाठी मोठमोठे प्रॉजेक्टर वा चित्रपटगृहांचीही गरज नाही. साध्या प्रॉजेक्टरवर घालून वा डीव्हीडी वा पेन ड्राइव्हरसुद्धा घालून कुठेही बघू शकतो. चक्क आपापल्या मोबाईलवरसुद्धा. या डिजिटल क्रांतीचा उपयोग करून गोव्यातली चित्रपट सृष्टी समर्थपणे आपल्या पायांवर उभी राहू शकते. प्रशिक्षणातही आणि प्रक्षेपणातही. यातून गोमंतकीय कलाकारही आंतरराष्ट्रीय चित्रपट सृष्टीचे आव्हान पेलण्यासाठी तयार होऊ शकतो आणि वास्तववादी सिनेमांची नवसंस्कृतीही गोव्यात तयार होऊ शकते. सुरवात लघुपटांपासून करून मग फीचर फिल्म असा हा प्रवास जास्त किफायतशीररित्या होऊ शकतो. परंतु दुर्दैवाने आम्हीही प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या अनिल कपूरचेच वंशज आहोत. दुसऱ्यांचे मनोरंजन करणारा गोवा. प्रमुख केंद्र म्हणून दर्जा दिला तरी स्वतःच्या अंगावरील कपडेसुद्धा फेकून देऊन दुसऱ्यांसमोर नाचण्यातच आम्ही धन्यता मानतो. म्हणूनच तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी आम्ही मनोरंजन सोसायटी स्थापन करतो. जिथे मूळ मानसिकताच दुसऱ्यांची खुषमस्करी करण्यापुरती मर्यादित आहे तिथे ताटात वाढून पुढ्यात दिलेले दर्जेदार आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे ताट खाण्याचे तंत्र समजून घेणारच कोण आणि कशाला? गेली अकरा वर्षे चित्रपट तंत्रज्ञानाचे हे पाणी आपल्या डोळ्यांदेखत मांडवीतून वहात अरबी समुद्रात गडप होतेय. पुढेही असेच चालू द्या. ही मनोरंजनाची संस्कृती व चित्रपट संस्कृतीवरची ही फुटकळ चर्चाही अशीच चालू द्या.

केवळ एक गोष्ट लक्षात असू द्या; आपण केवळ नाचायचे!!!

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs