खुजी संस्कृती

By Sandesh Prabhudesai
08 November 2015 21:57 IST

मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपल्या कार्यकाळाचे एक वर्ष पूर्ण केले तेव्हा घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्रश्र्न केलाः तुमच्या कारकीर्दीत तुम्ही साध्य केलेली सर्वात मोठी गोष्ट कोणती? पार्सेकरांनी जे उत्तर दिले ते सहसा कोणताच राजकारणी देत नाही. “सोशल मिडियावर माझी चाललेली चेष्टा बंद झाली ही मी साध्य केलेली सर्वात मोठी गोष्ट आहे असे मला वाटते.” वरवर पहाता कुणालाही वाटेल, काय चेष्टा चाललीय? मुख्यमंत्री कधी असली उत्तरे देतात का? पण पार्सेकरांचे हे उत्तर फारच मनस्वी होते. आणि अंतर्मुख करणारेही होते. पार्सेकर मुख्यमंत्री झाले तेव्हा ते चेष्टेचाच विषय झाले होते. त्यांची ढेंगणी शरीरयष्टी आणि बोलण्याची विशिष्ट ढब यामुळे ते थोडे मजेशीर वाटतातही. त्यात मनोहर पर्रीकरांशी तुलना करता सगळेच भाजपावाले ठेंगणेच वाटतात. पर्रीकर हे भाजपाची शक्तीही आहेत आणि सर्वात मोठी कमजोरीही. त्यांची लार्जर दॅन लाईफ प्रतिमा हीच भाजपाला आजपर्यंत कधीही स्वतःच्या बळावर सर्वाधिक जागा जिंकून देऊ शकली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा चर्चचा पाठिंबा नसता तर भाजपाला 21 ऐवजी केवळ 16 जागा मिळाल्या असत्या. कारण पर्रीकरांपुढे भाजपाचे इतर सगळेच उमेदवार खुजे वाटतात. त्याचाच फायदा भाजपाविरोधी उमेदवारांना होतो. त्यामुळेच पार्सेकर मुख्यमंत्री झाले तेव्हा तेही लोकांना खुजेच वाटले. आणि सगळेच सोशल मिडियावर – खास करून फेसबूकवर – त्यांची मिळेल तशी चेष्टा करीत सुटले.

सोशल मिडिया हा रस्ता आहे. रस्ता कुणाच्याच बापाचा नसतो आणि तरीही सर्वांच्याच बापाचा असतो. तिथे कुणीही कुणालाही काहीही म्हणू शकतो. आता सोशल मिडियाच्या रुपाने हा बोलणारा रस्ता लिखित स्वरुपात (फोटो, व्यंगचित्रे, व्हिडियो याही स्वरुपात) डॉक्युमेंट व्हायला लागलाय. त्यामुळे कोण काय म्हणतो ते संग्रहीतही होवू लागलेय. प्रत्येकाचा आवाज ऐकायला जायला लागलाय. त्या आवाजाची खुद्द मुख्यमंत्रीसुद्धा दखल घेतात हेच त्यांच्या विधानावरून स्पष्ट होते. सोशल मिडियामुळे लोकांच्या मनात काय चाललेय ते आता राजकारण्यांनासुद्धा कळायला लागलेय. परंतु असे म्हणून सोशल मिडिया हाच तमाच जनतेचा आवाज आहे असे मात्र अजिबात नव्हे. शितावरून भाताची परीक्षा तेवढी करता येते. सोशल मिडियावर आपली चाललेली चेष्टा आताशा कमी व्हायला लागलीय ही पार्सेकरांनी सांगितलेली गोष्ट खरीच आहे. पण म्हणून त्यांचे हे विधान सोशल मिडियावर झळकले तेव्हा त्यातले कित्येक सोशल मिडियावाले परत एकदा पार्सेकरांवर तुटून पडले. बिग जोकर वगैरे स्तुतिसुमने त्यांच्यावर उधळण्यात आली. पण ते अवघेच होते. पूर्वी सर्रास आला-गेला कुणीही नवीन मुख्यमंत्र्यावर तुटून पडत असे तसे चित्र नव्हते हेही तेवढेच खरे. कारण स्वतःबद्दलची प्रतिमा बदलण्यात पार्सेकरांना यश आलेले आहे. म्हणजे ते अतिशय कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत असे नव्हे, परंतु एक विदूषक अशी लोकांनी सोशल मिडियावर त्यांची जी प्रतिमा निर्माण केली होती ती आज नाही आहे. त्यादृष्टीने हे मतपरिवर्तन त्यांनी वर्षभरात साध्य केलेले आहे याबद्दल दुमत नसावे. आणि ही खचितच छोटी गोष्ट नाहीय. कारण सोशल मिडियावरील खुज्या संस्कृतीला आव्हान देऊन त्यांनी हे साध्य केलेय.

पार्सेकरांनी काय साध्य केलेय आणि किती साध्य केलेय हा या लेखाचा विषय नाहीय. त्याची चिकित्सा आणखीन कधी तरी करता येईल. परंतु आपणाला व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ मिळालेय त्याचा आपण कशा प्रकारे वापर करतोय त्याचा आहे. कारण सोशल मिडियामुळे प्रसार माध्यमे ही आता कुणा एका-दोघांची मक्तेदारी राहिलेली नाहीय. आता आपण सगळेच प्रसार माध्यमांचे मालक आहोत, लेखक-पत्रकार आहोत आणि आपणच वाचकही आहोत. आता आपण स्वतःचा ग्रुप वा ब्लॉग सुरू करू शकतो, आपणच आपणास हवे ते लिहू शकतो आणि इतरांचे सर्व प्रकारचे लिखाण वाचूही शकतो. पण म्हणून सोशल मिडियावर स्टेटस टाकताना वा कुणी टाकलेल्या पोस्टवर कमेंट करताना आपण जबाबदारपणे प्रतिक्रिया देतो का? जो कुणी स्टेटस टाकतो त्याच्या भावनांचा आपण विचार करतो का? स्टेटस टाकणाऱ्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? त्यावर साधकबाधक चर्चा करतो का? त्या गोष्टीवर सखोल विचार करतो का? त्या गोष्टीचे आपापल्या परीने विश्र्लेषण करण्याचा प्रयत्न करतो का?  की उचलतो जीभ आणि लावतो टाळ्याला? स्टेटसमागील विचारापेक्षा स्टेटस कुणाचा याचाच जास्त विचार करून आपण प्रतिक्रिया देतो का? त्यामुळे वस्तुनिष्ठ प्रतिक्रिया देण्याऐवजी व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया देण्याचेच प्रकार जास्त घडतात का? त्या विषयावर आपण थोडा तरी अभ्यास केलेला असतो का? की त्याच्याही पुढे जाऊन सोशल मिडिया म्हणजे कुणावर तरी तुटून पडण्याचे रणांगण असाच समज आपण करून घेतलेला आहे? त्यामुळे मिळाले सावज की ठोक त्याला हीच आपली वृती असते? मग त्यात आपले छुपे दुष्मनही सुटत नाहीत आणि सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीही!

 

सोशल मिडियावरील (फेसबूक, वॉट्स ऍप, ट्विटर वगैरे) काही स्टेटस वाचले तर असे वाटते की जगातला सगळ्यात विद्वान आणि सर्वज्ञानी माणूस हे आपण असतो. एवढ्यावरच हे संपले असते तर चालले असते. परंतु स्वतःला सर्वज्ञानी समजताना जगातली इतर सर्व माणसे मूर्ख आहेत हा आणखीन एक समज दिवसेंदिवस दृढ होत चाललेला आहे की काय अशी शंका येते. कारण या लोकांच्या दृष्टीने राहुल गांधी हा दूध पिणारा बच्चा आहे, नरेन्द्र मोदी हा राक्षस आहे, मोहन भागवत हा केवळ लांडी चड्डीवाला आहे, कपिल सिबलला शिक्षणातले काहीही कळत नाही, चर्चिल आलेमाव हा अशिक्षित आहे, आलिया भट्ट ही एक मूर्ख मुलगी आहे, शाहरूख खान, आमिर खान, सलमान खान हे केवळ मुसलमान आहेत वगैरे वगैरे. आता हे सगळे लोक आपापल्या क्षेत्रातले सेलेब्रिटीसही आहेत. लोकांनीच त्यांना डोक्यावर घेतलेले आहे. म्हणजे अशा लोकांना डोक्यावर घेणारे आपण कोण? हुषार?  विद्वान?  चतुर?  सर्वज्ञानी? पण मग हुषार लोक मूर्खांना कशाला डोक्यावर घेतील? सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या या व्यक्ती मूर्ख असतील तर पर्यायाने त्यांना डोक्यावर घेणारे आपणच मूर्ख ठरत नाही का? आपण ज्यांना मूर्ख म्हणतो त्यांना दुसरे डोक्यावर घेतात आणि ते मूर्ख म्हणतात ते आपले हिरो असतात एवढाच काय तो फरक. बाकी सगळा मूर्खांचाच बाजार झाला नाही का?

एकामागोमाग विद्वान व कार्यप्रवण साहित्यिकांच्या हत्या व्हायला लागल्या तेव्हा इतर साहित्यिकांमधली अस्वस्थता वाढायला लागली. त्यावर साहित्य अकादमीसारखी देशातली सर्वोच्च साहित्यिक संस्था गप्प राहिली म्हणून एकेक करून साहित्यिक आपापले पुरस्कार परत करायला लागले. लागोपाठ पद्म पुरस्कार मिळवणारेही पुरस्कार परत करायला लागले. काही विद्वानांना ही कृती आवडली नाही म्हणून त्यांनी निषेधाचा वेगळा मार्ग अवलंबिला वा वेगळा विचार व्यक्त केला. ही प्रत्येकाची वैयक्तिक कृती होती. त्यावर सोशल मिडियातनं आमच्या प्रतिक्रिया काय? पुरस्कार परत न करणारे भ्याड आहेत म्हणून कोण त्यांची खिल्ली उडवतो तर पुरस्कार परत करणारे भाजपाविरोधी आहेत म्हणून त्यांना बदनाम करतो. काहींनी तर चक्क डॉ नरेन्द्र दाभोळकर, कॉ गोविंद पानसरे व प्रा एम एम कलबुर्गी यांनासुद्धा बदनाम करायला मागेपुढे पाहिले नाही. त्यांच्या विद्वत्तेचा वा साहित्यिक प्रतिभेचा कसलाही मुलाहिजा न बाळगता. जणू काही सोशल मिडियावर प्रतिक्रिया व्यक्त करणारे आम्ही खरे विद्वान आहोत व वेगवेगळ्या परंतु वैचारिक पातळीवरील प्रतिक्रिया व्यक्त करणारे साहित्यिक, शास्त्रज्ञ वगैरे मूर्ख लोक आहेत. कुणाची तरी कृती आपणाला पसंत पडली नाही म्हणून त्या कृतीमागील विचारांचे खंडन करण्याऐवजी त्या व्यक्तीलाच बदनाम करण्याची कसली ही खुजी संस्कृती? सोशल मिडियासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आपण आणखीन प्रगल्भ होण्यासाठी वापरतोय की आपल्या संकुचित वृत्तीचे जाहीर प्रदर्शन करण्यासाठी? आणि हे सगळे पाहिल्यावर वाटते – आपण ज्ञानातून आणखीन विशाल होणाऱ्या संस्कृतीकडे वाटचाल करतोय की खुज्या, संकुचित, व्यक्तिनिष्ठ, विचारहीन व आत्मप्रौढी संस्कृतीकडे?

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 8 नोव्हेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

Good as usual. Social media is like knife. One uses knife to cut the cake to share among others. The same becomes very useful for other to slit somebody's throat. Finally who carries the knife and the purpose makes the difference.

- Madhav Bastodker, Ponda | 10 th November 2015 05:18

 

I fully agree with d views u hv expressed in this article.khuji sanskruti navhe .khujee manse khuje lok.

- baban bhagat, fatorda | 08 th November 2015 22:45

 

Related Blogs