आम्ही ‘बंदी’वासी

By Sandesh Prabhudesai
27 September 2015 21:29 IST

गुलाम हा बंदिवान असतो. मानवजात गुलामीच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून गेली. गुलामगिरी, वेठबिगारी, राजेशाही, सरंजामशाही, जमीनदारी, भांडवलशाही, साम्राज्यशाही अशा वेगवेगळ्या ‘शाही बंदिवासा’तून मानव मुक्त होत राहिला. वैज्ञानिक शोध लागत गेले तसे समाजाचे अर्थकारण बदलत गेले आणि तशी गुलामगिरीची एक व्यवस्था मोडीत काढून दुसऱ्या व्यवस्थेत माणूस जात राहिला. प्रत्येक नव्या व्यवस्थेत त्याला मागच्या व्यवस्थेपेक्षा जास्त स्वातंत्र्य मिळत गेले. या स्वातंत्र्यातून त्याची संस्कृती बदलत गेली. संस्कृती बदलण्याच्या संक्रमणावस्थेत जुने आणि नवे यांचा संघर्ष झाला. शेवटी नव्याचाच जय झाला. होणे साहजिकही होते. कारण ती नव्या व्यवस्थेची गरज होती. आर्थिक व्यवस्थेची आणि सामाजिक व्यवस्थेचीही. त्यातून नवसंस्कृती जन्माला आली, रूढ झाली, तिची परंपरा बनली. आणि या परंपरेचे पाईक मग त्याहून पुढची नवी संस्कृती जन्माला घालायला विरोध करायला लागले. आम्ही आमच्या या परंपरेसाठी संघर्ष केलाय, बलिदान दिलेय ते व्यर्थ जाऊ देणार नाही अशा निर्धाराने एकेकाळचे नवसंस्कृतीवाले नव-नव-संस्कृतीशी संघर्ष करायला उभे ठाकले. हा मानवजातीचा जिताजागता इतिहास आहे... आणि वर्तमानही आहे!

भौगोलिक सीमारेषा नसलेला सिंधुप्रदेश ते ब्रिटीशांनी आखून दिलेला भारत या प्रवासात आम्ही भारतीयसुद्धा कित्येक प्रकारच्या गुलामगिरीतून गेलो. पण त्याचबरोबर कित्येक क्रांतीकारी विचाररसणीसुद्धा याच सिंधुप्रदेशात जन्माला आल्या व जगभर पसरल्या. या भारत देशाने कित्येक नवनवीन धर्म जन्माला घातले. अर्थात, पूर्वीचे धर्म मानवजातीला बंदिवानासारखे वागवीत होते म्हणूनच. अन्यथा नव्या धर्मांची गरजच काय होती? या धर्मांनी नवीन संस्कृती तयार केल्या, त्या जोपासल्या आणि त्यांचे जुन्या धर्मांशी संघर्षही होत राहिले. वर्णाश्रमातून आम्ही मानवजातीला विभागले, त्यांच्या व्यवसाय व कामाप्रमाणे त्यांना वरचा-खालचा दर्जा दिला, त्यातून जाती जन्माला घातल्या आणि त्या मग माणसाच्या जन्माला नेऊन चिकटवल्या. त्या अजून चिकटपट्टीसारख्या चिकटवून आम्ही एक तर मिरवीत आहोत वा दुसऱ्यांची जिरवीत आहोत. आणि मानवानेच मानवाची अवहेलना करण्याची विकृत मजा अनुभवत आहोत. ब्रिटिशांची साम्राज्यशाही संपवून आम्ही लोकशाहीला कवटाळले खरे, परंतु सर्व लोक समान हे आजदेखील आम्ही मानायला तयार नाही. एकामेकांचा आदर करायला तयार नाही आणि जाती-धर्मविरहित दृष्टिकोणातून बंधुभावाला कवटाळायला तर अजिबात तयार नाही. भारतीय संविधानातील समतेची तत्वे ही आमची अजूनही शीत-कडी झालेली नाही, केवळ मध्येच जिभेला चटका लावण्यासाठी वापरलेले लोणचे म्हणूनच ते आम्ही वापरीत आहोत.

आणि याचाच परिणाम म्हणून बंदिवासातून मुक्त झालेला तथाकथित स्वतंत्र भारत हळूहळू नव्या ‘बंदी’वासात अडकत चाललेला आहे. बंदीचा बंदिवास. ब्रिटिशांची राजवट संपवून जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आम्ही झालो खरे, परंतु या लोकशाहीने दिलेल्या संविधानासारख्या उत्कृष्ट ग्रंथाचा उपभोग घेण्याची सुबुद्धी अजून आम्हा सर्वांना येत नाही हीच या लोकशाहीची खरी शोकांतिका आहे. मानवजातीला जाती-धर्मात विभागणारी कालची संरजामी संस्कृती आजही आम्ही सोडायला तयार नाही. संविधान 65 वर्षांचे जुने झाले तरी त्यातील नवसंस्कृतीच्या कित्येक संकल्पना अजून स्विकारायला आम्ही तयार नाही.  नव्याचा स्वीकार करण्याची वैचारिक तयारी अजून आमची होत नाही. त्यातूनच हे बंदीचे संघर्ष चालूच आहेत. कुणीतरी नव्या विचारांचा सिनेमा काढला, नाटक आणले वा पुस्तक लिहिले की लगेच जुने विचारवाले त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी करतात. एकगठ्ठा मतांवर डोळा ठेऊन असलेले राज्यकर्ते मग आपला हिशेब मांडतात व अल्पकाळाच्या सत्तेसाठी बंदी जाहीर करून नवविचारांचा बळी देतात. कधीकधी जुने विचारवाले आपली घोडी पुढे दामटतात तेव्हा नवविचारवाले त्यांच्यावर तुटून पडतात. कालपर्यंत त्यांनी बंदीच्या संकल्पनेलाच विरोध केलेला असला तरी आता तेच बंदीच्या मागणीचा घोशा लावतात आणि कधीकधी बंदी आणण्यात यशस्वी होतातही. काही वेळा तर केवळ बहुसंख्यांकांना खूष ठेऊन अल्पसंख्यांकांवर अंकुश ठेवण्याच्या राजकारणाचा भाग म्हणून राज्यकर्तेच आपणहून बंदी आणतात.  हे बहुसंख्यांक वा अल्पसंख्यांक धर्मावरूनच ठरवले जातात असे नव्हे, ते जातीवरूनही ठरवले जातात, पुरुष-स्त्रियांचाही हिशेब मांडला जातो आणि कधीकधी वर्गवारीही.

सध्या देशात अशा बंदींचे वा बंदींच्या मागण्यांचे पेव सर्वत्र फुटलेले आहे. मुळात बंदी घालून प्रश्र्न सुटतो का हा सर्वात मोठा प्रश्र्न आहे. कधीकधी बंदी अल्पकाळाचा प्रश्र्न सोडवू शकते, पण ती दीर्घकालाची समस्या बनून हळूहळू उभी रहाते. कधी कधी अक्राळविक्राळ बनूनसुद्धा अंगावर येते. विचार दडपला म्हणून तो नष्ट होत नाही. उलट तो आणखीनच ठाम बनतो आणि एक दिवस अनपेक्षितरित्या उसळी मारून लाट कशी अंगावर येतो. मुळात दडपशाही ही लोकशाहीच्या तत्वातच बसत नाही. ती केवळ हुकूमशाहीच्या तत्वात बसते. तेव्हा विचारांशी विचारांनी टक्कर देणे हीच खरी लोकशाही धारणा असावी. आपण त्याऐवजी शॉर्टकट घेतो तो सोयीचा भाग म्हणून. लोकशाहीतील रामबाण उपाय म्हणून नव्हे. आता नवा विचार आणि जुना विचार यांच्यात बहुमत जुन्या विचारांबरोबरच असते. त्यामुळे नवे विचार दडपले जातात. म्हणूनच ते लोकांच्या कलाने घेऊन मांडावे लागतात. त्यासाठी समाज बदलावा लागतो. उदाहरणादाखलच घ्यायचे झाल्यास समलिंगी संबंध ही आपली संस्कृतीच नाही आणि ती वैज्ञानिकही नाही तेव्हा हे संबंधच विकृत असतात हा झाला जुना विचार. आणि समलिंगी संबंध हा जीवशास्त्रीय संबंध आहे आणि त्यात अवैज्ञानिक काहीच नाही हा झाला नवा विचार. तेव्हा हा नवा विचार पटवून देण्याचे विविध वैज्ञानिक मार्ग शोधून काढणे हाच त्यावर उपाय असतो. त्यावर बंदी घातली म्हणून शरीराची झालेली जीवशास्त्रीय जडणघडण कोण कशी बदलणार? बदलायला हवा तो या संबंधांकडे बघण्याचा मानवीय दृष्टिकोण.

आणखीन एक गोष्ट महत्वाची. बंदीचा संबंध आपण थेट स्वातंत्र्याशी लावतो. बंदी आणणे म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्यावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणे. संविधानाच्या कलम 19 (1) नुसार आपणास सर्व प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहे. बोलण्याचे आणि अभिव्यक्तीचे, शांतीपूर्ण पद्धतीने सामुहिक जमण्याचे, संघटित होण्याचे, भारतभर फिरण्याचे वा भारताच्या कोणत्याही भागात जाऊन रहाण्याचे. आणि तरीही प्रमोद मुतालिक वा त्याच्या श्रीराम सेनेला गोव्यात येण्यास बंदी घातली तर सर्वोच्च न्यायालय ही बंदी उचलून धरते. कारण कलम 19 ला फक्त एकच उपकलम (1) नाही आहे. एकूण सहा उपकलमे आहेत. स्वातंत्र्य ही संकल्पना स्वैराचार व राष्ट्रीय व्यभिचार बनू नये म्हणून. या भारत देशाचे सार्वभौमत्व, एकात्मता, सुरक्षा, सामाजिक सुव्यवस्था, सभ्यता, नैतिकता वा इतर देशांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध यांना बाधा येण्यासारखे कृत्य कुणी करीत असेल तर ते कृत्य रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचाही अधिकार राज्यव्यवस्थेला संविधानाने दिलेला आहे. स्वातंत्र्याचा कुणी गैरफायदा घेऊ नये म्हणून. शिवाय अशा सर्व कृत्यांना रोखण्यासाठी  कायदेकानूनही केलेले आहेत. तेव्हा त्यांचा वापर करून स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई करणे हा खरा उपाय. त्यातून देशही पुढे जातो व संपूर्ण समाजाची मनोवृत्तीही विकसित होते. जनशिक्षण होते. ते महत्वाचे. केवळ दडपशाही बंदी नव्हे.

तरीही माझ्या दृष्टीने बंदीचा संबंध केवळ स्वातंत्र्याशी लावून प्रश्र्न कधीच सुटणार नाही. न्यायालयांनी विविध प्रकारच्या बंदींवर आपले निर्णय देताना केवळ स्वातंत्र्यापुरते मर्यादित न रहाता आणखीन एक गोष्ट सदोदित लक्षात ठेवलेली आहे. ती म्हणजे सहिष्णुता. इंग्रजीमध्ये टॉलरन्स. याचा अर्थ सहनशीलता असाही होतो. पण सहनशीलतेत थोडीबहुत जबरदस्तीही अंतर्भूत होते. मुकेपणाने सहन करणे. सहिष्णुता ही त्याहून पुढची संकल्पना. दुसऱ्याची बाजू समजून घेणे व दुसऱ्याच्या वेदनांशी सहमत होणे व दुसऱ्याच्या जीवनपद्धतीचा आदर करणे यांचा अंतर्भाव सहिष्णुतेत होतो. आजच्या क्षणी भारतात बंदींच्या होणाऱ्या मागण्या वा राज्यकर्त्यांनी आपणहून घातलेल्या बंदी यांचा सहिष्णु भावाने आपण विचार करू तेव्हाच कोणती बंदी बरोबर आणि कोणती बंदी चूक हे ठरवू शकू. केवळ स्वातंत्र्य हा माझा मूलभूत हक्क आहे एवढाच मर्यादित विचार केला तर मनाचा हा गोंधळ कधीच संपणार नाही. संविधानाने मला दिलेले स्वातंत्र्य हवे, परंतु त्याचा सहिष्णु भावाने वापर व्हावा असे समीकरण वापरूया. ही आपली सामाजिक संस्कृती बनवूया. केवळ बंदीची मागणी करणे वा बंदीला विरोध करणे ही संस्कृती नको. सहिष्णुतेचे स्वातंत्र्य असलेले सार्वभौमत्व ही संस्कृती हवी. तेव्हाच आपण या ‘बंदी’वासातून मुक्त होऊ.

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 27 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

It makes sense to ban, for example, alcohol and drug consumption, XXX porn access, driving licences for kids under 21, etc.

But to put blanket bans on such things on entire human race to foster a political or religious ideology is not only ludicrous but also counter productive.

- Pradeep, Sanguem | 28 th September 2015 01:51

 

Related Blogs